लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कुटुंबातील ९ पैकी ७ जण बाधित...त्यात ७३ वर्षीय वडिलांना मधुमेह, अस्थमा त्यांची बायपास झालेली.. अशी गंभीरावस्था असतानाही न घाबरता न डगमगता लवकर निदान व लवकर उपचार हे सूत्र वापरून वडिलांसह या अख्या कुटुंबाने एकजूटीने कोरोनाला हरविले.
मंगळवारी आई -वडिल बरे होऊन घरी आल्यानंतर त्यांचे मुलांनी स्वागत केले. ७३ वर्षीय डॉ. सुभाष देपुरा यांना गेल्या ३० वर्षांपासून मधुमेह आहे. त्यांना अस्थमा असून त्यांच्या फुफ्फुसांची शस्त्रक्रियाही झालेली आहे. यासह तीन वेळा ॲन्जीओप्लास्टी, बायपास अशा मोठ्या शस्त्रक्रिया त्यांच्यावर झालेल्या आहेत. अशात त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले होते. त्यांना २१ रोजी श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला मात्र, सुरूवातीला दम्याचा त्रास असेल असे कुटुबियांना वाटले मात्र, कुटुंबियांनी वेळ न घालवता तातडीने त्यांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेतली. यात ते बाधित आले. तातडीने त्यांना गणपती रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉ.कल्पेश गांधी यांनी त्यांच्यावर यशस्वी उपचार केले. डॉ. सुभाष देपुरा व त्यांच्या पत्नी शोभा देपुरा हे दोघेही बाधित होत. त्यांनी रुग्णालयात उपचार घेतले.
ऑक्सिजन ८८ वरून ९८
सुभाष देपुरा यांची ऑक्सिजनची पातळी मध्यंतरी ८८ वर पोहोचली होती. मात्र, त्यात ते डगमगले नाही. सक्षमपणे ,सकारात्मकतेने डॉक्टरांनी सांगितलेले उपचार ते घेत राहिले. त्यानंतर सात दिवसात त्यांची ऑक्सिजनची पातळी ९८ वर पोहोचली व कोरोनावर मात करून ते घरी परतले. यावळी त्यांचे कुटुंबियांनी स्वागत केले.
कुटूंबातील अन्य सदस्यांमध्ये तेजस देपुरा, अश्विनी देपुरा, विख्यात देपुरा, श्रेयस देपुरा, सुजाता देपुरा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यात तेजस देपुरा यांना सर्दी झाल्यानंतर त्यांनी तातडीने ॲन्टीजन चाचणी करून घेतली होती. यात ते बाधित आढळून आल्यानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाची टेस्ट करून घेतली होती. यानंतर लवकर उपचार घेऊन त्यांनी कोरोनावर मात केली.
...............
मला अनेक व्याधी आहेत. त्यात कोरोनाचा संसर्ग झाला. मात्र, लवकर निदान व लसीकरण यामुळे कोरोनावर मात करता आली. योग्य वेळी योग्य उपचार मिळणे यात महत्त्वाचे असते. हा आजार बरा होणारा आहे. यात घाबरून न जाता त्याला सामोरे जा, नियम पाळा, आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपचार घ्या.- डॉ. सुभाष देपुरा
...........
लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे, मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटकोरपणे पालन करावे, जेणे करून कोरोनाला प्रतिबंध करता येईल, यात लक्षणे जाणवल्यानंतर तातडीने तपासणी करून घेणे हे यात अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यामुळे पुढील गंभीर परिणाम टाळता येतात. लवकर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत. - तेजस देपुरा
.........
कुटुंब पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्ही अन्य सदस्यांची वारंवार टेस्ट केली. त्यात जे बाधित आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले शिवाय जे निगेटीव्ह होते. तेही विलग झाले. तातडीने निदान होणे हे कोरोनाला हरविण्याचे एक मोठे शस्त्र आहे. यासह लसीकरण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आई वडिलांनी लस घेतल्यामुळे आज त्यांनी अन्य व्याधी असतानाही कोरोनावर मात केली. - भूषण देपुरा