जळगाव : गुरूवारी लिक्विड ऑक्सिजनचे टँकर सायंकाळपर्यंत पोहोचणे अपेक्षित असताना ते न आल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर ऑक्सिजन पुरवठ्याचे संकट आले होते. मात्र, आधीच रुग्णालय प्रशासनाने अशा परिस्थितीचे नियोजन केले असल्यामुळे व शंभर सिलिंडरचा बॅकअप असल्याने मोठे संकट टळले. टँकर येईपर्यंत या आणीबाणीच्या परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व ऑक्सिजन समिती सदस्य टँकजवळच रात्री उशिरापर्यंत बसून होते.या बॅकअपवर २५० रुग्णांना साधारण तीन तास पुरवठा सुरू होता. टँकर पारोळ्यात दाखल झाले असून रात्री साडे अकरापर्यंत ते रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. आमच्याकडे पुढील सहा तासांचा बॅकअप असून आणखी सिलिंडरची व्यवस्था असल्याचे डॉ. रामानंद यांनी सांगितले. गेल्या चार ते पाच महिन्यांच्या काळात प्रथमच टँक पूर्ण रिकामी झाल्याचे त्यांनी सांगितले. ११ रोजी १६ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन या टँकमध्ये भरले गेले होते. रुग्णालयाला रोजची ८ मेट्रिक टन लिक्विडची गरज असते.
जळगावात मोठं ऑक्सिजन संकट टळलं; 'त्या' अचूक नियोजनामुळे २५० रुग्ण बॅकअपवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 11:37 PM