लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात सध्या कृत्रिम ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता जिल्ह्यातील ज्या कंपन्यांना इंडस्ट्री ग्रेडचा कृत्रिम ऑक्सिजन लागतो त्यांच्याकडून रिकामे ऑक्सिजन सिलिंडर गोळा करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे संकटाच्या वेळी हे सिलिंडर भरून रुग्णांसाठी वापरले जातील. सध्या एमआयडीसीचे अधिकारी आणि जिल्हा उद्योग केंद्राने याबाबत ३८ कंपन्यांची यादी तयार केली असून त्यांना त्यांच्याकडील ऑक्सिजन सिलिंडर जमा करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात फॅब्रिकेशन वर्क्स, मेटल, स्टिल इंडस्ट्री आणि पेपर मिल यांना इंडस्ट्री ग्रेड ऑक्सिजनची गरज भासते. इंडस्ट्री ग्रेड ऑक्सिजन हा रुग्णांना दिला जात नसला तरी मेडिकल ग्रेड ऑक्सिजन आणि इंडस्ट्री ग्रेड ऑक्सिजन या दोन्हींसाठी लागणारा रिकामा सिलिंडर हा एकाच प्रकारचा असतो. त्यामुळे प्रशासनाने हे रिकामे सिलिंडर गोळा करण्याचे काम जिल्हा उद्योग केंद्र आणि एमआयडीसीला दिले आहे. त्यानुसार ३८ कंपन्यांना पत्र देण्याचे काम शुक्रवारीच सुरू करण्यात आले आहे. तसेच येत्या दोन ते तीन दिवसांत किती सिलिंडर गोळा होतील, हे कळणार आहे. यात काही कंपन्यांनी स्वत:हून सिलिंडर देण्याची तयारी दाखवली आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक आर.आर. डोंगरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.