लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विविध उद्योगांमध्ये कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत असते. मात्र, सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची वाढती गरज पाहता उद्योगांमध्ये लागणारा सर्व ऑक्सिजन आणि सिलिंडर आता वैद्यकीय कारणांसाठी वापरण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.
स्टील, मेटल, वेल्डिंग, पेपर मिल्स यासारख्या विविध उद्योगांमध्ये इंडस्ट्री ग्रेडचा ऑक्सिजन वापरला जातो. तो कृत्रिम ऑक्सिजन देखील द्रव ऑक्सिजनमधून तयार केला जातो. त्यामुळे या सर्व उद्योगांमध्ये असलेला ऑक्सिजन आता वैद्यकीय कारणांसाठी वापरण्याचे आणि सिलिंडर तातडीने जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे.
जिल्ह्यात सध्या २५ पेक्षा जास्त उद्योग असे आहेत, ज्यांना दैनंदिन उत्पादन आणि विविध कामांसाठी कृत्रिम ऑक्सिजनची गरज असते. मात्र, आता हा सर्व ऑक्सिजन वैद्यकीय कामांसाठी वळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे सिलिंडर जमा करण्याच्या कामावर देखरेख जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी करणार आहेत. उद्योगांनी त्यांच्याकडील सिलिंडर जमा करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक आर. आर. डोंगरे यांनी केले आहे.