लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना रुग्णांची वाढती संख्या, त्यात ऑक्सिजनवरील रुग्णांचे प्रमाण प्रचंड, त्यामुळे निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या आणीबाणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ऑक्सिजन नर्स या सतर्क राहून ऑक्सिजनचा हवा तितका वापर व्हावा, याची काळजी घेत असल्याने ऑक्सिजनच्या मागणी घट झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी नीला जोशी, दिव्या सोनवणे, किरण साळुंके, लीना चौधरी चार परिचारिकांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. परिचारिका दिनानिमित्त या रुग्णसेवेचे समाधान असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेचे कोविड उपचारासाठी सर्वात मोठे हॉस्पिटल असून या ठिकाणी ३६८ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. यातील सर्वच रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण सेंट्रल ऑक्सिजन सिस्टिम आहे. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी ऑक्सिजन टँकच उभारण्यात आला आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता या टँकमध्ये दररोज ८ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन टाकावा लागतो. अशातच ही मागणी दिवसेंदिवस वाढत असताना ऑक्सिजनच्या अतिरिक्त वापरावर तसेच ते वाया जाऊ नये यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली अधिसेविका कविता नेतकर यांनी चार परिचारिकांची यासाठी नियुक्ती केली.
यावर ठेवले नियंत्रण
बऱ्याच वेळा रुग्ण हे जेवणासाठी किंवा अन्य कारणासाठी ऑक्सिजन मास्क काढून ठेवत असतात, अशा वेळी या ऑक्सिजन नर्स ऑक्सिजनचा पुरवठा थांबविता, तितका वेळ ऑक्सिजनची बचत होत असते.
अनेक वेळा रुग्ण स्वत:हून ऑक्सिजनचे प्रेशर वाढवत असतात, मात्र जर कमी ऑक्सिजनवर रुग्णाची ऑक्सिजन पातळी सामान्य राहत असेल तर त्यावर या नर्स लक्ष ठेवून असतात, त्यामुळे अतिरिक्त वापराला आळा बसतो, प्रेशरवर नियमित त्या लक्ष ठेवून असतात.
दर चार तासांनी व राऊंड घेऊन या नर्स सर्व रुग्णांच्या ऑक्सिजन आवश्यकतेबाबतचा रिपोर्ट अधिसेविका कविता नेतकर यांच्याकडे देत असतात.
पंधरा दिवसात परिणाम
पंधरा दिवसांपूर्वी लागणारे ऑक्सिजन व ऑक्सिजन नर्ससेच्या नियुक्तीनंतर लागणारे ऑक्सिजन यातील सकारात्मक परिणाम समोर आले आहे. मागणी घटली असून अतिरक्त वापर थांबल्याने थोडाफार का होईना रुग्णालय प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. शिवाय रुग्णांचीही व्यवस्थित मॉनिटरिंग होण्यास मदत होत आहे.
स्वतंत्र कॉलम
परिचारिका दिनाबाबात काय वाटते......
कोरोनाच्या या आपत्ती काळात परिचारिका आपले जीवन इतरांसाठी समर्पित करीत आहेत. त्यांच्याबद्दल सर्वांनीच आदर बाळगायला हवा- प्रा. मनोरमा इसाक, गाेदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग कॉलेज
हे क्षेत्र असे आहे की यातील शिक्षण कधीच संपत नसते. या महामारीच्या काळात बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. देशाची प्रगती ही आरोग्य सेवा प्रणालीवर पूर्णत: अवलंबून आहे. आरोग्य सेवेची यंत्रणा कोलमडली तर ती देशाची हानी होईल. - प्रा. जोसिन दाया, गोदावरी नर्सिंग कॉलेज