लाेकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मोहाडी येथील कोविड रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प होत असून, यासाठी आधी मंजूर करण्यात आलेली जागा बदलवून हा प्रकल्प मोकळ्या जागेत करावा, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सूचविल्यानंतर रुग्णालयाच्या परिसरात समोर मोकळ्या जागेवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. येत्या दोन दिवसात याच्या फाउंडेशनच्या कामाला सुरुवात होणार आहे.
सुरुवातीला ऑक्सिजन सिलिंडरचे पॅनल असलेल्या जागेजवळ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी जागा अंतिम केली होती. या जागेची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोमवारी सायंकाळी पाहणी केल्यानंतर या ठिकाणी आवाजामुळे रुग्णांना त्रास होऊ शकतो, म्हणून ती रुग्णालयाच्या थाेडी दूर असावी, असा सल्ला दिला. त्यानंतर दुसरी जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागेवर सध्या वाळू व खडी पडलेली असल्याने ती बाजूला करून लवकरच सपाटीकरण करून या प्रकल्पाच्या फाउंडेशनचे काम सुरू होणार आहे. लवकरच हा प्रकल्प उभा राहणार आहे.
दररोज २५० सिलिंडर ऑक्सिजन
जिल्ह्यातील पाच ठिकाणी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एक असे सहा प्रकल्प आगामी दीड ते दोन महिन्यात जिल्हाभरात उभे राहणार आहे. मोहाडी येथील प्रकल्पातील दिवसाला २५० सिलिंडरपर्यंत ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. आगामी तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने स्थानिक पातळीवरच मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होणार असल्याने ऑक्सिजनच्या तुटवड्यातून दिलासा मिळणार आहे.