लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील सहा ठिकाणच्या ऑक्सिनज प्रकल्पांचा पूर्ण होण्याचा अवधी वाढत असून, यात प्रशासकीय काही बाबी अडथळ्याच्या ठरत असल्याने याचा कालावधी अजून महिनाभरावर लोटला गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील हा प्रकल्प निविदांमध्ये अडकला आहे. दोन वेळा निविदा न आल्याने त्यांना मुदतवाढ मिळाली आहे.
गेल्या महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील पाच प्रकल्पांना मान्यता मिळून त्यांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले होते. यात मोहाडी येथील प्रकल्पाची जागा ज्या ठिकाणी अंतिम झाली होती. ती नंतर बदलण्यात आली होती. या जागेवर काही दिवसांपूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजनही करण्यात आले मात्र, याचे सपाटीकरण बाकी असून, यानंतर या ठिकाणी फाउंडेशनचे काम होणार आहे. अन्य प्रकल्पांच्या बाबतीतही हीच स्थिती आहे.
केंद्राचे काम वेगात
प्रशासकीय यंत्रणेपेक्षा केंद्र सरकारकडून मंजूर झालेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या कामाने वेग पकडला असून, याचे फाउंडेशनचे काम जवळपास पूर्णही झाले आहे. याची मशीनरीही लवकरच दाखल होणार आहे. ३० जूनपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
निविदांचा फेरा
ऑक्सिजन टँकसाठीही निविदांचा तिढा लवकर न सुटल्याने दोन ते तीन महिन्यांचा अवधी लागला होता. तशीच काहीशी सुरुवात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी झाली आहे. याच्या निविदांना योग्य निविदाधारक न उपलब्ध झाल्याने दोनवेळा मुदतवाढ मिळाली आहे. या निविदा उघडल्यानंतर त्याचे कार्यरंभ आदेश देऊन त्यानंतर महिना ते दीड महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.