लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील पाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे कार्यारंभ आदेश शुक्रवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिले असून यासाठी चार ते सहा आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी दीड महिन्यात हे प्रकल्प कार्यान्वित होऊन प्रत्येकी १०० ते २५०० सिलिंडर ऑक्सिजन यातून निर्मिती होईल, अशी माहिती दिली.
हवेतून ऑक्सिजन निर्मित करणाऱ्या या प्रकल्पांच्या प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्या होत्या. मात्र, कोटेशन पूर्ण न आल्याने कार्यारंभ आदेश देण्यात आले नव्हते. ते शुक्रवारी देण्यात आले. दरम्यान, जिल्ह्याला लागणारी ऑक्सिजनची गरज यातून बऱ्यापैकी भागविली जाणार असून मोठा प्रश्न मिटणार आहे. आणिबाणीच्या परिस्थितीत हे प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. हवा शोषूण ड्रायरच्या माध्यमातून स्वतंत्र ऑक्सिजन निर्मिती या प्रकल्पातून होणार आहे.
या कंपन्यांना हे प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी चार ते सहा आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. शिवाय पुढील दोन वर्ष देखभाल दुरूस्तीची जबाबदारी ही कंपन्यांची राहणार आहे. काही अडथळे आल्यास पुढील २४ तासात त्यांनी ते सोडवून द्यायचे आहेत. अशी माहितीही त्यांनी दिली.
यांना दिले काम
मुक्ताईनगरचा प्रकल्प : एसपी इक्वीपमेंट
जामनेर : मेवन कॉपोरेट
चाळीसगाव, चाेपडा आणि मोहाडी रुग्णालय : लक्ष्मी सर्जिकल
अशी आहे क्षमता
मुक्ताईनगर, चाळीसगाव : ५०० लीटर प्रति मिनिट, १०० ते १५० सिलिंडर प्रतिदिन
मुक्ताईनगर, चोपडा, मोहाडी रुग्णालय : १००० लीटर प्रतिमिनिट, २०० ते २५०० सिलिंडर प्रतिदिन