पाचोरा(जळगाव)- निवडणुकीत खर्चाची बनावट बिले सादर करून पाचोरा पीपल्स बँकेची १० लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सहायक निबंधकासह तीन जणांवर पाचोरा पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक निबंधक प्रताप बाबा पाडवी (जळगाव), समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा चालक (पांडव नगर, आदर्श नगर, जळगाव) आणि कपिल प्रिंटर्सचा संचालक विलास जोगेंद्र बेंडाळे (जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पाचोरा पीपल्स बँकेच्या सन २०११-१२ ते २०१५-१६ या कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाडवी यांची नियुक्ती करण्यात आली होती. वरील तीनही जणांनी बनावट बिले सादर केली आणि निवडणूक खर्चासाठी १० लाख २० हजाराची रक्कम काढून बँकेची फसवणूक केली. यात कपिल प्रिंटर्सच्या नावाने २ लाख ६८ हजार ४२५, समर्थ टूर्सच्या नावाने ४० हजार, सु.भा. पाटील शाळेच्या इमारत भाडयापोटी ६२ हजार रुपयांचे बनावट बिले सादर करण्यात आली आहेत.
या प्रकरणी आरटीआय कार्यकर्ते पंकज श्रावण सोनार (रा. एअरपोर्ट रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली. त्यावरुन पाचोरा पोलिसात वरील तीनही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश चोबे हे तपास करीत आहेत.