पाचोरा, जि. जळगाव : दि पाचोरा पीपल्स को-आॅपरेटिव्ह बँकेच्या विद्यमान आठ संचालकांनी जळगाव जिल्हा उपनिबंधक सहकार विभाग यांच्याकडे सामूहिक राजीनामे सादर केल्यामुळे बँकिंग क्षेञात खळबळ उडाली आहे.येणाऱ्या काळात बँकेत नोकरभरती होणार असून त्या अगोदरच राजीनाम्याचा हा भूकंप पाचोरा तालुक्यातिल सहकार व राजकारणाला अचानक कलाटणी देणारा असून विश्वसनीय वृत्तानुसार लवकरच या बँकेवर प्रशासक बसण्याची शक्यता आहे.गेल्या २० वर्षांपासून विद्यमान चेअरमण अशोक संघवी यांची एकहाती सत्ता आहे. चेअरमन यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून संचालकांनी आपले राजीनामे दिल्याचे समजते. यात विद्यमान संचालक डॉ. जयंत पाटील, प्रकाश पाटील, अॅड. अविनाश भालेराव, मयुरी मुकुंद बिल्दिकर, कल्पना सुधाकर पाटील, राजेंद्र भोसले, प्रा. भागवत मालपुरे व विकास वाघ या आठ संचालकांनी आपले राजीनामे जिल्हा उपनिबंधकांना सादर केले.
पाचोरा पीपल्स बँकेच्या आठ संचालकांचे सामूहिक राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 1:00 PM