पहूर ता. जामनेर : पशुधनाची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडून पोलिसांनी १५ बैलांची सुटका केली. याप्रकरणी सिल्लोड येथील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. बैल व वाहनांसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहूरनजीक रविवारी रात्री १० वाजता ही घटना घडली. शेख अस्लम शेख अकबर, शेख रमजान शेख सिकंदर व झाकीर अब्दुल अझीझ (सर्व रा. बोरगाव ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एका वाहनातून (क्र.एम.एच. २० एल/ ६७२०) १५ बैलांना औरंगाबादकडे नेले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलीस पथकाने रविवारी रात्री १० वाजता पहूरनजीक महावीर पेट्रोल पंपाजवळ या वाहनाची तपासणी केली. त्यात १५ बैल कोंबलेले आढळून आले.
पोकॉं. श्रीराम धुमाळ यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिसात वरील तीनही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर लागलीच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातील चार लाख पाच हजार रुपये किमतीचे १५ बैल व सात लाख रुपये किमतीचे आयशर वाहनासह अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोमवारी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. उपनिरीक्षक अमोल देवडे, पोकॉं. श्रीराम धुमाळ, मोरे व होमगार्ड यांनी ही कामगिरी बजावली.