लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : भाजपकडे स्वतःचा नेता नाही. म्हणून ते दुसऱ्यांचे नेते चोरून मतं मागतात. भाजपने जाहीर करावं, येत्या निवडणुका ते मिंधे गटाच्या नेतृत्वात लढणार आहेत का? मी आव्हान देतो तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण आणि मोदींचा चेहेरा घेऊन या. मी माझं नाव घेऊन येतो. बघूया महाराष्ट्र कोणाला निवडून देतो, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व शिंदे गटाला आव्हान दिले आहे.
रविवारी पाचोरा येथे माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. पाटील यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. राज्यात लवकरच निवडणुका लागतील. त्यामुळे ज्या गद्दारांना शिवसेनेने घोड्यावर बसविले त्यांना आता खाली खेचायची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप आगामी निवडणुक ही मिंधे गटाच्या नेतृत्वात लढणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. पावसाळ्यात नाही तर आताच निवडणुका होऊन जाऊ द्या. आमच्या मशालीच्या ज्वालांनी तुमचे सिंहासन जाळल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी मी फकीर आहे, असे सांगत आहेत. त्यांच्या मागे पुढे कुणी नाही. ते कधीतरी झोळी लटकवून निघून जाणार, माझ्या जनतेच्या हाती कटोरा देऊन जातील, मग जनतेने काय करायचे, असा सवालही त्यांनी केला.
निवडणूक आयोगावर टीकाठाकरे यांनी भाषणाला सुरुवात करताच उपस्थितांनी प्रतिसाद दिल्यानंतर, शिवसेना कोणाची हे स्पष्ट होत असल्याचे सांगितले. ही जनतेचे समर्थन पाहून पाकिस्तानदेखील सांगणार की शिवसेना कोणाची? मात्र मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला कळले नाही , असे सांगत ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली.