लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : परंपरेप्रमाणे संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील पौर्णिमेचा पालखी उत्सव यंदा प्रतिपदेला पहाटे साजरा झाला. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत प्रसाद महाराज यांच्यासह भजनी मंडळींनी ' पुंडलिक वर देव हरी विठ्ठल ' ग्यानबा तुकाराम ...' सखाराम महाराज की जय म्हणत ताल धरला होता.
पहाटे विधिवत पूजा करून लालजींची मूर्ति वाडी मंदिरातून बाहेर काढून पालखीत ठेवण्यात आली. परंपरेप्रमाणे सर्व समाज पालखीला आपल्या खांद्यावर वाहून नेतो. दरवर्षी वाडीतून, राजहोळी चौक, सराफ बाजार, दगडी दरवाजा, फरशी रोड , पैलाड मार्गे बोरी नदी पात्रात समाधी मंदिरासमोर पालखी आणली जाते या मिरवणुकीला संध्याकाळ व्हायची यंदा मात्र उलट्या मार्गाने अवघ्या 50 फूट अंतरावर वाडी मंदिरातून पालखी मिरवणूक समाधी मंदिरासमोर आणण्यात आली.
नदी पात्रात आल्यावर प्रसाद महाराज व भक्तांनी अभंग म्हटले आणि त्यानंतर टाळ मृदुंगाच्या तालावर पदन्यास केला. गुलाल उधळत परत पालखी वाडी मंदिरात आणून मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी पुरोहित सुनील देव ,अभय देव मोजके वारकरी , भाविक आणि काही प्रतिष्टीत व्यक्ती हजर होते.