अमळनेर, दि.10- विठोबा रूख्माईचा जयघोष, ढोल ताशांचा गजरात बुधवारी सकाळी वाडी संस्थानमधून पालखी मिरवणुकीस सुरवात झाली. कडक उन्हातही दर्शनासाठी भाविकांचा उत्साह प्रचंड होता.
सकाळी सहा वाजता पुजा झाली. यावेळी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हाधिकारी किशोर राज ेनिंबाळकर, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, आदी उपस्थित होते.
पालखीत श्रीलालजी यांची मूर्ती ठेवल्यानंतर सकाळी 8 वाजता पालखी मिरवणुकीस सुरवात झाली. पालखीच्यामागे छोटया रथात मूळ सखाराम महाराजांच्या पादुका होत्या. त्यांच्यापुढे नगारा, बेलापुरकर महाराजांची दिंडी होती. रणरणत्या उन्हातही प्रसाद महाराज अनवाणी चालत होते. रस्त्यात जागोजागी प्रसाद महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती.
पालखीच्यापुढे दोन घोडेस्वार, त्याच्या मागे बलवीर व्यायामशाळा, प्रतापकुमार व्यायामशाळा यासह विविध झांज पथके होती.
सोबतीला भुसावळचा रेल्वे मजदूर संघाच्या बॅण्ड साथ देत होता. या बॅन्ड पथकाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. भर उन्हात ढोलताशे वाजविणा:यांचे कौशल्य नागरिक उत्साहाने पहात होते. दुपारी 12 वाजेर्पयत ही पालखी सराफ बाजारातच होती. भाविकांतर्फे विठ्ठोबा-रूख्माईचा जयघोष करण्यात येत होता.