जळगाव- तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कंवरनगरातील वर्सी महोत्सवाचा रविवारी चौथ्या दिवशी पल्लव साहेबाने समारोप झाला़ उत्सवाच्या शेवटच्या दिवशी हजारोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी समाधीजवळ गर्दी केली होती़ यावेळी भाविकांनी भक्ती गीतांवर नृत्य व गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केला.शहरात गेल्या ५० हुन अधिक वर्षांपासून सुरु असलेल्या सिंधी समाजाचे अमर शहीद संत कंवरराम साहब व संत बाबा हरदासराम साहब गोदडीवाले बाबा व संत बाबा गेलाराम साहब यांचा वर्सी महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. दरम्यान चार दिवसाच्या वर्सी महोत्सवाला देशभरातून सुमारे ५० हजाराहून अधिक भाविकांची उपस्थिती होती. दरम्यान रविवारी सकाळी ११ वाजता अमरावती येथील संत कंवरराम यांचे पणतू साई राजेशकुमार यांच्या उपस्थितीत परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली. प्रसंगी संतांनी लहान बालकांना आपल्या झोळीत टाकून परमेश्वराकडे त्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करुन त्यांना आशिर्वाद दिले. यावेळी बाबा गेलाराम यांचे शिष्य संत पहलाजराय, उल्हासनगरचे बलराम साहेब व फैजाबादचे संत नितीनलाल उपस्थित होते.भक्तांनी धरला ठेकामहोत्सवात भाविकांनी देखील विश्वशांती, सुख समृद्धीसाठी प्रार्थना करुन भक्तीगीतांवर आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करुन दुपारी १ वाजेच्या सुमारास मोठ्या भक्तीमय वातावरणात पल्लव साहेबने चार दिवसापासून सुरु असलेल्या वर्सी महोत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी भाविक मोठया संख्येने उपस्थितीत होते. वर्सी महोत्सव पार पाडण्यासाठी पूज्य अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टचे सर्व सदस्य व पूज्य पंचायतचे सर्व सदस्य यांनी सहकार्य केले.