जळगाव : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या साठवण बंधारे तसेच जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून झालेल्या सिंचन प्रकल्पातून वाहतूक करण्यात आलेल्या गौण खनिजात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला आहे. मागील सहा महिन्यांपासून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सत्याने पाठपुरावा करीत आहे. परंतु, कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान, आता या प्रकरणात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.येत्या दोन दिवसात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. मंगळवारी विभागीय आयुक्तांना या प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी निवेदन पाठविली असल्याचेही तक्रारदार जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी दिली आहे. जिल्हा परिषद सीईओ, अतिरिक्त सीईओ यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना याचिकेत सहभागी करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीला सुरूवात रॉयल्टी प्रकरणाच्या चौकशीसाठी आणि दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सावकारे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु झाली आहे. परंतु, जि.प.सिंचन विभाग आर्थिक गुन्हे शाखेला कागदपत्रे पुरवत नाही, असाही आरोप पल्लवी सावकारे यांनी केला आहे. मंगळवारी कागदपत्रांसाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हा परिषदेचे धडकले असल्याचीही माहिती त्यांनी दिली. तसेच आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिले असून सिंचन विभागाकडून चौकशीसाठी कागदपत्रे देण्याची मागणी केली आहे.