लोकमत न्यूज नेटवर्क
कजगाव, ता. भडगाव : दोन गावात भर वस्तीतील बंद घर खोलून दिवसाढवळ्या तीन लाखाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविला. या घटनेमुळे ग्रामस्थांत घबराट पसरली आहे याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्धभडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
दि. २० रोजी अंजनविहिरे येथील संजय पाटील व परिवार शेतात गेले होते. दरम्यान, शेतीकाम आटोपून घरी आल्यानंतर घराचे कुलूप तोडलेले दिसले. आत पाहणी केली, तर कपाट उघडून त्यातील साऱ्या सोन्याच्या वस्तू चोरट्यांनी लांबविल्या होत्या. अंदाजे दोन ते अडीच लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. तेथून आठ-दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आमडदे येथील अनिल साहेबराव पाटील यांच्या घरी जबर चोरी झाली. अनिल पाटील हे आयशर गाडीचे ड्रायव्हर आहेत. ते सकाळी कामावर गेले व पत्नी मनिषा अनिल पाटील या शेतात गेल्या असताना दरवाज्याचे कुलूप तोडून चोरांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉकर तोडून ७४ हजार रुपये रोख व १० ग्रॅम सोन्याचे दागिने असा सव्वा लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
संध्याकाळी मनिषा पाटील या शेतातून घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी आरडाओरडा केल्यावर शेजारी जमा झाले. त्यांनी लागलीच पोलीस पाटील यांना खबर दिली. रात्री पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
अंजनविहिरे येथील चोरीचा तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार आनंद पठारे हे करीत आहे तर आमडदे येथील तपास फौजदार सुशील सोनवणे हे करत आहे.
श्वानपथक, ठसेतज्ज्ञास पाचारण
रात्री दोन्ही ठिकाणी श्वानपथकास व ठसेतज्ज्ञास पाचारण करण्यात आले होते. श्वान परिसरातच घुटमळत होते. पोलीस तपासात सीसीटीव्हीचे फुटेज तपासले जाणार आहे. त्यात काही हाती लागले तर तपासास दिशा मिळू शकते. दोन्ही गावातील भरवस्तीतील बंद घराची कुलूप तोडून दिवसाढवळ्या चोरी करत चोरट्यांनी पोलिसासमोर आव्हानच उभे केले आहे.