जळगाव : रॉयल गोल्ड फायनान्स कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून पिंटू बंडू इटकरे याने घेतलेल्या कागदपत्रांचा दुरुपयोग करीत बोगस कंपनींची नोंदणी करून फसवणूक केल्याची तक्रार पहूर येथील प्रवीण कुमावत व अशोक सखाराम सुरवाडे यांनी शनिवारी शहर पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी तक्रार अर्जातून केली आहे.
३ मार्च रोजी नाशिकच्या जीएसटी पथकाने पहूर येथील प्रवीण कुमावत यांच्या वेदांत मेडिकलवर धाड टाकल्यावर त्यांची कृष्णा स्टील नावाने असलेली कंपनीचे जीएसटी थकले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आपली कुठलीही कंपनी नसल्याचे त्यांनी पथकाला सांगताच फसवणूकचा प्रकार समोर आला. अखेर या प्रकरणात पथकाने पहूर येथून कैलास भारुडे व जळगावातून पिंटू इटकरे यांना ताब्यात घेतले. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे कळताच प्रवीण कुमावत व त्यांचे मित्र अशोक सुरवाडे यांनी शनिवारी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार अर्ज दिला आहे.
काय आहे तक्रार
तक्रार अर्जात म्हटले की, रॉयल गोल्ड फायनान्स कंपनीत नोकरीसाठी जागा निघाल्यामुळे प्रवीण कुमावत व अशोक सुरवाडे हे कंपनीत आले होते. फायनान्स कंपनीचे अकाउंटंट पिंटू बंडू इटकरे याने कागदपत्र घेऊन येण्याचे सांगितले. त्यानुसार आधारकार्ड, पॅनकार्ड व बँक पासबुक झेरॉक्स व कॅन्सल चेक दोघांनी इटकरे यांच्याकडे जमा केले. पंधरा दिवसांनी दोघांच्या घरी चेक बुक व एटीएम आले. ते इटकरे यांनी कंपनीत जमा करून घेतले. आठ ते दहा महिन्यात आठवड्यातून दोन दिवस कुमावत व सुरवाडे यांना नोकरीला बोलविले जात होते. त्याचा पगारही दिला गेला़ मात्र, काही दिवसांनंतर कंपनी तोट्यात असल्याचे सांगून त्यांना दुसरी नोकरी शोधण्याचे सांगण्यात आले़ त्यातच शुक्रवारी नाशिकच्या जीएसटी पथकाच्या धाडीत दोघांच्या नावावर कंपनी दाखवून जीएसटी थकविल्याचा प्रकार समोर आला.
दोघा पीडितांनी केली चौकशीची मागणी
नोकरीसाठी घेतलेले कागदपत्रांचा दुरुपयोग करून बनावट कंपनीची नोंदणी करून फसवणूक केली असून याप्रकरणाची चौकशी करावी, असे प्रवीण कुमावत व अशोक सुरवाडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शनिवारी सकाळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांची भेट घेऊन तक्रार अर्ज देण्यात आले आहे.
आणखी किती जणांची फसवणूक?
नोकरीच्या बहाण्याने कागदपत्रे मागवून त्या नावावर कागदोपत्री व बनावट कंपनी तयार केल्याचा हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर फसविल्या गेेलेल्या तरुणांनी पोलिसात धाव घेतली. त्यामुळे या प्रकरणात नोकरीच्या बहाण्याने किती जणांची फसवणूक झाली याबाबतची उत्सुकता आहे.