पारोळा : येथील प्रभाग १ मधील सिद्धार्थनगर व कुरेशी मोहल्ल्यात गेल्या २० ते २२ दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रभागातील महिलांनी १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पालिकेवर मोर्चा काढला. तत्काळ पाणीपुरवठा सुरु करण्यासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी करून संताप व्यक्त केला.सिद्धार्थनगर व कुरेशी मोहल्ल्यालगतच्या परिसरात दोन वेळा पाणी सोडले जाते. परंतु, आमच्या भाग पाण्यापासून वंचित ठेवला जात आहे. राजकारण न करता नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी गौतम जावळे, जावेद कुरेशी, राजू सरदार यांनी केली. परिसरातील गटारी, ढापे व विहिरीचा गाळ काढणे याकडे नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.यावेळी मुख्याधिकारी दालनात महिलांसह पुरुषांनी पाण्यासाठी मागणी केली. जोपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला.मुख्याधिकारी डॉ.सचिन माने व पुरवठा अभियंता पंकज महाजन यांनी महिलांना समजावले. व्हॉल्व्ह खराब झाल्याने पाणी पुरवठ्यास उशीर होत आहे. हॉल दुरुस्ती होईपर्यंत अग्निशामक गाडीच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी गौतम जावळे, जावेद कुरेशी, मस्तान शेख, सलिम सदर, शकिल कुरेशी, राजु कुरेशी, राजु सरदार, मंदान कुरेशी, जुबेर शेख, मनोज वानखेडे, सचिन मोरे, छोटू वानखेडे, समिना कुरेशी, सुलतानाबी, शमीनबी, जुलेदा तायराबी, तसलिमाबी आदींचा मोर्चात सहभाग होता.गेल्या २२ दिवसांपासून परिसरात पाणी येत नाही. आमचा कुणी प्रतिनिधी नाही म्हणुन द्वेषापोटी राजकारण केले जात आहे. प्रशासनाला जागे करण्यासाठी आम्हाला मोर्चा काढावा लागला.-गौतम जावळे, नागरीकशहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन टाक्या आहेत. प्रत्येकास रोटेशनप्रमाणे पाणी सोडण्यात येते. अचानक पाण्याच्या टाकीजवळचा व्हॉल्व्ह खराब झाल्याने सिद्धार्थनगर व कुरेशी मोहल्ला या भागात पाणी पुरवठा करण्यास उशीर झाला. सदर काम युद्धपातळीवर सरूआहे. पर्यायी व्यवस्था म्हणुन तात्पुरते टँकर देण्यात येईल.-डॉ. सचिन माने, मुख्याधिकारी
महिलांचा पारोळ्यात नगरपालिकेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 9:30 PM