ऑनलाईन लोकमत जळगाव, दि.29 - भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असणा:या रक्षाबंधन या पवित्र सणासाठी आता ‘सृष्टीबंध’ या पर्यावरणपूरक राखीची निर्मिती करण्यात आली आहे. बांबूपासून तयार केलेल्या या राख्यांमुळे अनेक आदिवासी बांधवांच्या हातांना काम मिळाले आहे.
जळगाव येथील समर्पण संस्था संचलित पर्यावरण शाळा अनेक वषार्पासून पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात कार्य करीत आहे. पर्यावरणाविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य पर्यावरण शाळा करीत आहे. यावर्षी ‘रक्षाबंधन’ या पर्वासाठी बांबूने तयार केलेल्या आकर्षक पर्यावरणपूरक राख्या पर्यावरण शाळेकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कोरकू, गोंड आदिवासी बांधवांचा सहभाग
मेळघाटातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्रातर्फे कोरकू, गोंड आदिवासी यांच्यासह पारंपरिक कारागीर असलेल्या बुरूड समाजाच्या लोकांचाही या राखी प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. बांबू, नैसर्गिक रंग, मणी इत्यादी साधनांचा उपयोग करून या इको-फ्रेण्डली राख्या तयार केल्या आहेत.
सृष्टीबंध नावाने राखी
सृष्टीबंध या नावाने बांबूच्या राख्या तयार केला आहे. जळगाव शहरात या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मेळघाटातील आदिवासींनी बांबूपासून तयार केलेल्या राख्या संपूर्ण इको-फ्रेण्डली पद्धतीने तयार केलेल्या आहे. सुबक स्वरुपातील या राख्यांमुळे आदिवासी बांधवाना रोजगार मिळाला आहे. या प्रकल्पांतील उत्पादनांच्या प्रदर्शनाला जळगावातील पर्यावरण शाळेत प्रारंभ केला आहे.