दुसऱ्यांदा मुदतवाढ; २३ जुलैपर्यंत करावे लागणार प्रवेश निश्चित
सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठीच्या बहुतांश जागा अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी पुन्हा २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आरटीई प्रवेशासाठी एप्रिल महिन्यामध्ये ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली. कोरोनामुळे एक महिना ही प्रक्रिया थांबली होती. गेल्या महिन्यापासून ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे; परंतु पालकांनी अद्यापही शाळांमध्ये जाऊन प्रवेश घेण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे ९ जुलैपर्यंत पालकांना प्रवेश निश्चितीसाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, तरीही अपेक्षित तसा पालकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यानुसार निवड यादीतील विद्यार्थ्यांना २३ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावयाचा आहे.
२१७९ विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश
जळगाव जिल्ह्यातील २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी आरटीई प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या जागांसाठी एकूण ५ हजार ९३९ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. त्यापैकी २ हजार ६९५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची लॉटरी लागली आहे. यातील २१५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे तर २१७९ विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये तात्पुरता प्रवेश मिळविला आहे. अजूनही ५३८ विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बाकी आहे.
०००००००००००
लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांपैकी २१५७ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांच्या पालकांना लवकरात लवकर प्रवेश निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता २३ जुलैही ही अंतिम मुदत प्रवेश निश्चितीसाठी देण्यात आली आहे.
- बी. एस. अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी
०००००००००००
- काय म्हणतात पालक
लॉटरी लागल्यानंतर एसएमएस प्राप्त झाला होता. त्यानंतर शाळेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित केला. प्रवेश प्रक्रियेत कुठलीही अडचण आली नाही. मुलाच्या शिक्षणालाही सुरुवात झाली आहे.
- नीलेश खैरनार, पालक
..........
प्रवेश निश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मुलाची आरटीई प्रवेशासाठी निवड झाल्याचा एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शाळेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घेतली होती.
-विशाल वरयाणी, पालक
०००००००००००
शासन सध्या तोंड दाबून बुक्क्याचा मार असे करतेय. आरटीई प्रवेशावर सर्व शाळांनी बहिष्कार टाकला होता. त्यावर संघटनांनी निवेदन देऊन मार्ग काढण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यावर शासनाने असा निर्णय जाहीर केला आहे की, शाळा चालक शाळा चालवाव्या की बंद कराव्या, अशा संभ्रमात आहेत. प्रतिपूर्ती मिळत नाही, निषेध करू शकत नाही, तसे केले तर गटशिक्षणाधिकारी नोटीस काढतात. काय करावे, काय नाही, अशा विवंचनेत सध्या संस्थाचालक आहेत.
-उत्कर्ष पवार, अध्यक्ष, इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन
००००००००००००
आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या शाळा- २९६
शाळांमधील जागा - ३०६५
एकूण अर्ज प्राप्त - ५९३९
लॉटरी लागलेले विद्यार्थी - २६९५
तात्पुरते प्रवेश - २१७९
प्रवेश निश्चित - २१५७
एकूण शिल्लक जागा - ९०८