फोटो - १३ सीटीआर ५२
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी संकेतस्थळावर अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. पालकांना ओटीपी मिळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानुषंगाने पोर्टलवर ओटीपीची तांत्रिक अडचण असून त्यावर काम चालू आहे. तोपर्यंत अर्ज न भरण्याचे आवाहन आरटीईच्या संकेतस्थळावर करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवार, ३ मार्चपासून सुरू झालेली आहे. त्याअंतर्गत पालकांकडून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरले जात आहे. अर्ज भरण्यासाठी २१ मार्चपर्यंत मुदत आहे. मात्र, पालकांना अर्ज भरताना 'ओटीपी' मिळत असल्याने अर्ज भरण्यास अडचण येत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आरटीईच्या पोर्टलवर ओटीपीची तांत्रिक अडचण आलेली आहे. ती दूर करण्याचे काम सुरु आहे. तोपर्यंत पालकांनी अर्ज भरू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, ओटीपीची तांत्रिक अडचण दूर झाल्याची सूचना पोर्टलवर दिली जाईल, अशाही प्रकारची सूचना देण्यात आली आहे.
३ हजार १९२ पालकांनी केले अर्ज
जळगाव जिल्ह्यात २९६ शाळांमधील ३ हजार ६५ राखीव जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत. आतापर्यंत ३ हजार १९२ पालकांनी आपल्या पाल्याच्या आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरले आहेत.