जळगाव : बालकांच्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर राबविण्यात येत असलेली आरटीई प्रवेशाची सोडत बुधवारी पुण्यातून व्हीसीद्वारे काढण्यात आली आहे. आता यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून एसएमएस पाठविण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
दरवर्षी शिक्षण विभागाच्या वतीने आरटीईची प्रवेशप्रक्रिया राबविली जात असते़ त्यानुसार २५ टक्के राखीव जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यंदा ३ मार्चपासून ऑनलाईन आरटीईच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली होती़ ३ ते ३० मार्चपर्यंत पालकांना पाल्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी ४ हजार ९३९ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते.
संकेतस्थळ पाहण्याचेही आवाहन
बुधवारी पुण्यातील प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण उपसंचालक द ग़ो़ जगताप यांनी ऑनलाईन व्हीसीद्वारे आरटीईची सोडत जाहीर केली. दरम्यान, किती विद्यार्थ्यांची सोडतीत निवड झाली, याची यादी मात्र जाहीर करण्यात आली नाही. १५ एप्रिलपासून पालकांना प्रवेशासाठीचे एसएमएम पाठविले जाणार असल्याचे व्हीसीत सांगण्यात आले असल्याची माहिती जळगाव शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली. परंतु, एसएमएमवर अवलंबून न राहता आरटीईच्या संकेतस्थळावर लॉगिन करून यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच निवड झालेल्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत प्रवेश घेणे आवश्यक आहे.