अमित महाबळ
जळगाव : जळगावसह खान्देशच्या सांस्कृतिक क्षेत्रातील क्रियाशील संस्था म्हणून ‘परिवर्तन’ओळखली जाते. गेल्या काही वर्षांपासून परिवर्तनच्या नाटकांचे व सांगीतिक कार्यक्रमांचे महोत्सव राज्यभर होत आहेत. आता मुंबईतील कुर्ला येथील प्रायोगिक रंगभूमीसाठी महत्वाचे ठरू पहात असलेल्या 'प्रबोधन प्रयोग घर' येथे २६ ते २८ ऑगस्ट दरम्यान तीन दिवसीय ‘परिवर्तन महोत्सव’आयोजित करण्यात आला आहे.
असे आहेत कार्यक्रम : महोत्सवाची सुरुवात मराठी आणि इंग्रजी कवितेच्या विश्वात स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या अरूण कोलहटकरांच्या ‘भिजकी वही’ या काव्यसंग्रहातील कवितांचे सादरीकरणाने २६ ऑगस्टला होणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना नारायण बाविस्कर यांची तर दिग्दर्शन पुरुषोत्तम चौधरी यांचे आहे. २७ ऑगस्टला श्रीकांत देशमुख लिखित व शंभु पाटील नाट्यरुपांतरीत, योगेश पाटील दिग्दर्शित ‘नली’एकलनाट्य, २८ ऑगस्टला शंभु पाटील लिखित व मंजुषा भिडे दिग्दर्शित ‘अमृता साहिर इमरोज’हे नाटक सादर होणार आहे.
हे आहे वैशिष्ट्य : महोत्सवातील तीनही दिवसाचे कार्यक्रम दररोज सायंकाळी ६.३० वाजता सादर होणार आहेत. तीन दिवस एकाच संस्थेची निर्मिती असलेले, तीन उत्तम कार्यक्रम असलेला ‘परिवर्तन महोत्सव’ प्रबोधन प्रयोगघरात प्रथमच होत आहे. खान्देशची भाषा, लोकसंस्कृतीने युक्त असलेला हा महोत्सव आहे.