गावोगावी पाणी मागण्यासाठी पर्जन्यराजाला साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा : गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पर्जन्यराजाने डोळे वटारल्याने बळीराजाच्या तोंडचे पाणी पाळले आहे. गावोगावी पाणी मागण्यासाठी वरुणराजला साकडे घातले जात असून 'धोंडी धोंडी पाणी दे, साय माय पिकू दे' म्हणत महिला आबालवृद्ध धोंडी काढत आहेत.
कोरोनाच्या संकटातून सावरत नाही तोच खरीप हंगामासाठी शेतकरीवर्ग कामाला लागला. मात्र ह्या वर्षी हंगाम चांगला येईल, अशी अपेक्षा असतानाच गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हैराण झाला आहे. ऐन बहरलेल्या हंगामाला पाण्याची गरज असताना पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
पाचोरा तालुक्यात आजपर्यंत २७६ मि.मी. पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी ह्याच दिवसात ४०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला होता. नद्या-नाल्याना खळखळून पाणी वाहत होते. धरणात जलाशयात ५० टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा झाला होता. सर्वत्र माळरान बहरलेली होती. श्रावणसरी बरसत होत्या. मात्र ह्यावर्षी हंगाम तेजीत येईल, अशी परिस्थिती असताना अचानक पाऊस गायब झाला. खरिपाची पिके कोमेजू लागली आहेत. पिकांची वाढ खुंटली असून उडीद, मूग, चवळी, सोयाबीन, मका पिकाला फटका बसला असून, आशा धुळीस मिळाल्या आहेत. यामुळे शेतकरी शेतमजूर व त्यावर आधारित व्यावसायिक चिंतेत सापडले आहे.
पाऊस ह्या आठवड्यात यायला हवा अन्यथा हंगाम वाया जाऊन दुष्काळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी गावोगावी धोंडी काढणे, जिवंत माणसाची प्रेतयात्रा काढणे, महादेवाचा गाभारा पाण्याने भरणे आदी कल्पना करून शेतकरी आशावादी रहात आहेत. पाऊस लवकर बरसावा, श्रावण आल्याचा आनंद वाटावा, अशी पाचोरा तालुकावासीयांची अपेक्षा आहे.