लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वाहनतळात दगड, कचरा यामुळे वाहने लावण्यास अडचणी येत होत्या, त्या पार्श्वभूमीवर रविवारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विद्यार्थ्यांसह या ठिकाणी श्रमदान करून हे सर्व वाहनतळ सपाटीकरण केले. यात आता वाहने लावायला पुरेशी मोकळी जागा झाली आहे.
१ फेब्रुवारीपासून वैद्यकीय महाविद्यालय देखील सुरू झाले. रुग्णालय व महाविद्यालयात गेट क्रमांक २ मधून वाहनांना प्रवेश दिला जातो. या वाहनतळामध्ये रुग्णालय व महाविद्यालयातील गजबज आता वाढली असून दुचाकी पार्किंगसाठी जागा उरत नाही. रविवारी १४ फेब्रुवारी रोजी प्रेमदिनाच्या दिवशी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत वाहनतळाच्या जागेवर सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत श्रमदान करून वाहनतळ सपाटीकरण मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, डॉ. विजय गायकवाड यांच्यासह चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. श्रमदानामध्ये लहान मोठे दगड, गोटे, विविध कचरा यासह उंच व सखल झालेली जमीन एकसारखी करणे अशा पद्धतीने काम करण्यात आले. त्याचबरोबर पूर्वीचे प्रसाधनगृहांचे राहिलेले अवशेष देखील यावेळी जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले. यावेळी स्वच्छता निरीक्षक अनिल बागलाणे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी मंगेश बोरसे, ज्ञानेश्वर डहाके, मयुर पाटील, जितेंद्र करोसिया, अजय जाधव, प्रकाश पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी सुजय पट्टणशेट्टी, सर्व्हेश काबरा यांच्यासह सफाई कामगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
फोटो १५ सीटीआर २५