लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मुख्य भागात वाहनांची गर्दी टाळण्यासाठी शासकीय निवासस्थानांच्या मागील बाजूस जागा सपाटीकरण करून पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, गुरुवारी ट्रायल म्हणून या ठिकाणी सुरक्षा रक्षक नियुक्त करून सर्व वाहने पार्क करण्यात आली.
दिवसभरात काही किरकोळ वाद उद्भवले मात्र, नवे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पार्किंग समिती स्थापन करून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, यासाठी दोन सुरक्षा रक्षकही वाढविण्यात आले आहे. रस्त्याच्या मधोमध एक तर पार्किंगच्या ठिकाणी दोन सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. केवळ अधिकारी वर्गाच्या वाहनांनाच पुढे प्रवेश दिला जाणार आहे.
गेट नं. १ मधून रुग्णवाहिका आणि रुग्णांनाच प्रवेश असणार आहे, तर मधल्या गेटवरपण एक सुरक्षा रक्षक कायम तैनात राहणार आहे. जेणेकरून कुठलेली अन्य वाहन इकडून तिकडे जाणार नाही. असे नियोजन करण्यात आले असून, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी त्याचा आढावा घेतला.