परमार्थ म्हणजे स्वस्वरूपाचे ज्ञान करून घेण्याची विद्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या ईश्वराला आणि जीवाने साक्षात दर्शन घेण्याच्या पंथाला परमार्थ म्हणतात. परमार्थरूपी आत्मविद्येला भगवान श्रीकृष्ण गुह्यतम शास्त्रम् व ‘गृह्यात गृह्यतम् ज्ञानम्’ म्हणतात. परमगुह्ये म्हणजे अत्यंत गोपनीय. परमार्थ गुह्य आहेच. परमात्मा प्रत्येकाच्या चिदांकाशात लपलेला आहे. आकाशाचे दोन प्रकार आहेत. बाहेरील आकाश व आतील आकाश. बाहेरील आकाशाची कल्पना येणे कठीण नाही. आपण डोळ्यांनी ते पाहू शकतो. आपला देह आणि इतरांचा तसेच जड द्रव्याने बनलेल्या साºया वस्तू बाहेरील आकाशात हालचाल करतात. बाहेर अपारपणे पसरलेल्या या आकाशाप्रमाणेच आपल्या आतमध्ये देखील एक आकाश आहे. त्यामध्ये दृश्य व स्थूल वस्तुंना स्थान नाही. त्यामध्ये चेतनेचा खरा खेळ अनुभवास येतो. आपल्या अंर्तयामी असणारे जे अंत:करण शुद्ध चैतन्याचेच एक कमी शुद्ध रूप आहे. शुद्ध मुक्त बद्ध शांत चैतन्याला ते कमी अधिक झाकते. अंत:करणाने झाकलेले आत्मरूप शुद्ध चैतन्यच अंतिम सत्य आहे.इंद्रियांच्या पुराव्यांवर आधारलेले विज्ञान बाहेरील सत्याचा शोध करते. त्यास सर्व शक्तीसंपन्न विश्वमनाची कल्पना येऊ शकते. पण शक्तीचे अधिष्ठान जो परमात्मा त्यांचे साक्षात दर्शन कधीच होऊ शकत नाही. पुष्कळ माणसे जीवनामध्ये अंतरीच्या आकाशात खºया अर्थाने संचार करण्याचा प्रयत्नच करीत नाही. आज आपण बाहेरच्या आकाशात जितक्या सहजपणे संचार करतो तितक्याच नव्हे तर त्याहून अधिक सहजपणे आतील आकाशामध्ये संचार करायला शिकणे ही परमार्थाची खरी साधना आहे.- दादा महाराज जोशी, चिमुकले राम मंदिर, जळगाव.
परमार्थ स्तवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 11:44 PM