ऑनलाईन लोकमत
पारोळा,दि.21- बोरी कॉलनीत आमदार डॉ.सतीश पाटील व खासदार ए.टी.पाटील यांचे शेजारी असलेले डॉ.भागवत पाटील यांच्या घरी अज्ञात चोरटय़ांनी घरफोडी करीत 10 तोळे सोने, रोख रक्कम असा एकूण साडेचार ते पाच लाखांचा ऐवज 19 रोजी रात्री लंपास केला. या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल आहे.
शहरातील बोरी कॉलनी ही उच्चभ्रुवस्ती आहे. या कॉलनीतील रहिवाशी डॉ. भागवत पाटील यांचा बंगला असून, त्यांच्या बंगल्याच्या एका बाजुला खासदार ए.टी.पाटील यांचे तर दुस:या बाजुला आमदार डॉ.सतीश पाटील यांचे निवासस्थान आहे. तर मागच्या बाजुला नगराध्यक्ष करण पाटील यांचे निवासस्थान आहे.
डॉ.भागवत पाटील हे नातू आजारी असल्याने, 17 रोजी सप}ीक नगरला गेले होते. घर बंद असल्याचा फायदा घेत चोरटय़ांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले 10 तोळे सोने, आणि पावणे दोन लाख रूपये रोख असा एकूण साडेचार ते पाच लाखांचा ऐवज लंपास केला.
या घरात प्रवेश करण्यापूर्वी चोरटय़ांनी खा.पाटील यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर बॅटरीचा प्रकाश टाकला. मात्र तेथे सुरक्षा रक्षक असल्याने, त्यांनी आपला मोर्चा डॉ. पाटील यांच्या बंगल्याकडे वळविला. चोरटय़ांनी डॉ.पाटील यांच्या घराच्या मागील बाजुस काहीतरी आवाज करून, सुरक्षा रक्षकाचे लक्ष त्याकडे वेधले. नंतर ते पाटील यांच्या बंगल्यात घुसले आणि चोरी केली. खासदार पाटील यांच्या घरावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले असून, त्यांची संख्या चार होती.
डॉ. भागवत पाटील आज सकाळी नगरहून परत आले. त्यांना घराचा कडीकोंडा तुटलेला दिसला. घरात कपाटातील साहित्य फेकलेले दिसले. बंगल्यात चोरी झाल्याचे त्यांनी शेजारच्यांना सांगितले. घटनास्थळी खा.ए.टी.पाटील, आमदार डॉ.सतीश पाटील, नगराध्यक्ष करण पाटील, डॉ. बी.एम.पाटील यांनी भेटी देवून चौकशी केली.