ऑनलाईन लोकमत
पारोळा,दि.24- पारोळा येथे आज आमदारांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक आयोजित केली होती. मात्र बैठकीला तहसीलदार गैरहजर असल्याने, आमदारांनी याबाबत निषेध व्यक्त करीत, प्र.तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांना फैलावर घेत संताप व्यक्त करून बैठक रद्द केली.
नवीन तहसील कार्यालयात आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या उपस्थितीत दक्षता समितीची बैठक होती. या बैठकीला तालुक्यातून स्वस्त धान्य दुकानदार, रॉकेल विक्रेते उपस्थित होते. आमदार डॉ.पाटील सभागृहात आल्यावर तहसीलदार वंदना खरमाळे रजेवर असल्याचे समजले. त्यामुळे डॉ. पाटील यांनी प्रभारी तहसीलदार पंकज पाटील यांना धारेवर धरले. तहसीलदारांना बैठकीला उपस्थिती राहण्यास वेळ नव्हता तर बैठक कशासाठी आयोजित केली? कामकाजाचे त्यांना गांभीर्य नाही असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच या प्रकाराचा निषेध व्यक्त करीत बैठक रद्द झाल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. पाटील यांनी पुरवठा अधिकारी प्रणील पाटील यांनाही खडसावले. तालुक्यासाठी रॉकेलचा कोटा किती येतो ? तो कमी जास्त होतो का? याची सर्व अद्ययावत माहिती मला द्यावी. तसेच किती आधारकार्ड लिंकींग झाले याचीही माहिती द्यावी, अशी ताकीद दिली. तालुक्यात प्रभारी राज सुरू असून कोणाचे नियंत्रण नाही. तसेच पाण्याची भीषण टंचाई असुनही त्याचे तहसीलदारांना गांभीर्य नसल्याचे डॉ. पाटील म्हणाले. तालुक्यात काम करायचे नसेल तर बदली करून घ्या. कामचुकारपणा करणा:यांची गय केली जाणार नाही अशी तंबीही डॉ. पाटील यांनी उपस्थित अधिका:यांना दिली.
यावेळी सभापती सुनंदा पाटील, वैशाली मेटकर, माणक जैस्वाल, अशोक पाटील, अशोक वाणी, अरूण वाणी, दिनकर पाटील, शरद वाणी यांच्यासह दुकानदार उपस्थित होते.