मुक्ताईनगर : विविध मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने पशुधन पर्यवेक्षक आणि सहायक पशुधन विकास अधिकारी यांनी मंगळवारपासून राज्यभर काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला मुक्ताईनगर पशुचिकित्सा व्यावसायिक संघटनेने पाठिंबा दिला असून, सहभागी झाली आहे.
सहायक आयुक्त पशुसंवर्धन पशुधन विकास अधिकारी गट अ सेवा प्रवेश नियमात सुधारणा करणे, पशुधन विकास अधिकारी गट पंचायत समिती पदनामात बदल करणे, तिसरी कालबद्ध पदोन्नती वेतन निश्चितीत सुधारणा करणे, वेतनातून कायम प्रवासभत्ता मंजूर करणे, २७ ऑगस्ट २००९ ची अधिसूचना रद्द करणे, पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना फ्रंटलाइन वर्कर घोषित करून विमा सुरक्षाकवच व आवश्यक सेवेतील सुविधा देणे अशा विविध प्रकारच्या ११ मागण्या करण्यात आल्या होत्या; परंतु त्याबाबत काहीच हालचाल नसल्याने मंगळवारपासून राज्यभर कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात मुक्ताईनगर संघटनेच्यावतीने सहभाग नोंदवून कामबंद आंदोलन पुकारले आहे, त्याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी नागतिलक, सहायक गटविकास अधिकारी जैन यांना देण्यात आले. यावेळी सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. सी.एस.हलगे, डॉ. एन.जे.जवरे, डॉ.आर.व्ही.नरवाडे, वाय.व्ही.चौधरी, एस.बी.गेडाम उपस्थित होते.