जळगाव : सक्षम व सुदृढ लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रियेत महिलांचा सहभाग महत्त्वपूर्ण असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार नोंदणी कार्यक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने निवडणूक प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय ऑनलाइन कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांचेसह निवडणूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अचूक मतदार यादी महत्वाची
जिल्हाधिकारी राऊत पुढे म्हणाले की, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अचूक मतदार यादी महत्त्वाची असते. याकरिता मतदार नोंदणी करताना ती बिनचूक असावी. यासाठी महिलांसह माध्यमांची भूमिका व योगदान महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर मतदार नोंदणी कार्यक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या बीएलओचा सत्कार झाला. प्रास्ताविक सुनील सूर्यवंशी यांनी केले.