जळगाव : माझ्या पक्षांतराबाबत सध्या केवळ मीडियावरच चर्चा सुरू आहे. या क्षणापर्यंत तरी कोणत्या पक्षात जाण्याबाबत माझा विचार नाही, असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. असे असले नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच खडसे हेदेखील नागपुरात असल्याने ते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलेले आहे.मंत्रीपदाचा राजीनामा देण्यापासून ते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने व त्यानंतरही मुलगी अॅड. रोहिणी खडसे यांचा पक्षातीलच हितशत्रूंमुळे पराभव, पक्षांच्या कार्यक्रमात डावलणे अशा विविध कारणामुळे भाजपकडून सतत अन्याय व अपमानाची वागणूक मिळत असल्याचे सांगत खडसे यांनी या पूर्वी अनेक वेळा जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर गोपीनाथ गडावर पक्षांतराबाबत ‘माझा काही भरोसा नाही’, असे म्हणणारे एकनाथराव खडसे हे शिवसेनेत जाणार तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असे वृत्त सध्या येत आहे.जिल्ह्याचे लक्षउत्तर महाराष्ट्रात भाजप वाढीमध्ये सिंहाचा वाटा असणाºया खडसे यांच्यावर पक्षाकडून खरोखरच अन्याय होत असल्याचे आता त्यांचे समर्थक, कार्यकर्ते म्हणू लागले आहेत. मात्र खडसे जो काही निर्णय घेतील, तो विचारपूर्वकच घेतील, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यात नागपुरात अधिवेशन काळातच खडसे तेथे असल्याने ते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.‘या क्षणापर्यंत तरी विचार नाही’तून वेगळेच संकेतमाझ्या पक्षांतरांबाबत केवळ मीडियावर चर्चा सुरू आहे. मला तर या बाबत काही माहित नाही, असे एकनाथराव खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्याच वेळी ‘या क्षणापर्यंत तरी माझा तसा विचार नाही’, असे खडसे म्हणाले. यातून ते पुन्हा गोपीनाथ गडावर ‘पक्षांतराबाबत माझा काही भरोसा नाही....’ याद्वारे दिलेले संकेतच पुन्हा देत असल्याचे स्पष्ट होत आहे.वैयक्तीक कामासाठी मी नागपूर येथे आलो असल्याचेही खडसे यांनी सांगितले.
पक्षांतराबाबत केवळ ‘मीडिया’कडूनच चर्चा - एकनाथराव खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:19 PM