मुक्ताईनगर : गेल्या पंधरा वषार्पासून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेजारी असलेल्या येथील भारतीय जनता पक्ष कार्यालयावर लावण्यात आलेले फलक दोन- तीन दिवसांपासून अचानक गायब झाल्याने मतदारसंघात एकच उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. सदर फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा फोटो तसेच पक्षाच्या विविध ज्येष्ठांचा फोटो लावलेला होता. मात्र फलक गायब झाल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात आहेत.सध्या बाजुला सारण्यात आलेले माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा वरचष्मा असलेल्या मुक्ताईनगर मतदार संघातील या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून खडसे यांनी घेतलेली भूमिका पक्ष ,बदलाची चर्चा ,बीड येथील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या चमूचा घेतलेला खरपूस समाचार यामुळे माजी मंत्री खडसे हे पक्ष बदल करून राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा केवळ मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण राज्यात सुरू आहे.त्यातच मुक्ताईनगर भाजप कार्यालयावरील पक्षाचा फलक गायब झाल्याने पुन्हा तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. त्यातच खडसे यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नागपूर येथे गुप्त भेट घेतल्याची चर्चा सुरू असून एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे. अशातच फलक गायब झाल्याने या पक्ष बदलाच्या चर्चेचा बळकटी आली आहे.परंतु यासंदर्भात मात्र भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कल्पना दिसून येत नाही. परंतु तरीही माजी आमदार खडसे हे जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य आहे, आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, अशा प्रतिक्रियाही माजी आमदार खडसे यांच्या समर्थकाद्वारे देण्यात येत आहेत.निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहितेनुसार प्रशासनाने दिलेल्या आदेशाने फलक काढण्यात आलेला होता.-दशरथ कांडेलकर, भाजप तालुका अध्यक्ष, मुक्ताईनगर
मुक्ताईनगर येथील भाजप कार्यालयावरील पक्षाचे फलक गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 9:11 PM