जळगाव, दि.2- सिमी अर्थात स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया या खटल्यात दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावलेला परवेज खान रियाजोद्दीन खान (वय 40, रा.दंगलग्रस्त कॉलनी,जळगाव) याला रविवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक सेंट्रल जेलमध्ये रवाना केले. आसिफ खान बशीर खान व परवेज खान रियाजोद्दीन खान दोन्ही आरोपींना न्यायालयाने शनिवारी दहा वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती.
शिक्षा सुनावल्यानंतर परवेज याने उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने बाहेरुन औषधी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती, मात्र कारागृहात सर्व सुविधा असतात, त्यामुळे तेथेच डॉक्टरांना दाखवून औषधी घेण्याचा सल्ला देत न्यायालयाने त्याची मागणी फेटाळून लावली होती. शनिवारी संध्याकाळी कारागृहात गेल्यानंतर त्याने आजाराबाबत कोणतीच तक्रार केली नाही, मात्र तरीही वैद्यकिय तपासणी करुनच त्याची नाशिकला रवानगी करण्यात आल्याची माहिती कारागृह अधीक्षक डी.टी.डाबेराव यांनी ‘लोकमत’ ला दिली.
एस्कॉटच्या बंदोबस्तात रवानगी
अतिशय संवेदनशील खटल्यातील आरोपी असल्याने पोलीस प्रशासनाने त्यासाठी कडेकोट बंदोबस्त लावला होता. एका मोठय़ा वाहनातून त्याला नेण्यात आले. त्यासोबत एक अधिकारी व चार कर्मचारी शस्त्रासह बंदोबस्त होता, याशिवाय मागे स्वतंत्र एस्कॉर्ट व्हॅन देण्यात आली. त्यातही शस्त्रधारी चार कर्मचारी देण्यात आले होते. सकाळी साडे आठ वाजता कारागृहात कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर नऊ वाजेच्या सुमारास त्याला घेऊन पोलीस नाशिककडे रवाना झाल्याची माहिती पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक शालिक उईके यांनी दिली.
नातेवाईकांची गर्दी
परवेजला नाशिक येथे नेण्यात येणार असल्याने त्याची प}ी व अन्य नातेवाईकांची कारागृहाबाहेर गर्दी झाली होती. त्यांच्याशी चर्चा करुन परवेज पोलीस वाहनात बसला. दरम्यान, या गुन्ह्यातील दुसरा आरोपी आसिफ खान हा पुणे येथील येरवडा कारागृहात आहे. या निकालाची प्रत त्याचे वकील अॅड.ए.आर.खान यांना संध्याकाळी देण्यात आली.