ऑनलाईन लोकमत
जामनेर, जि. जळगाव, दि. 16- चालत्या रिक्षात एका व्यक्तीला फिट येऊन त्यांची पत्नी ओरडल्याने चालकाचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा उलटून झालेल्या अपघातात सुधाकर पंढरीनाथ मेतकर (40, रा. गारखेडा, ता. जामनेर) हे जागीच ठार झाले तर इतर दोन जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडला. जामनेर ते भुसावळ जाणारी प्रवासी रिक्षा (क्रमांक एम. एच .19 ए. एक्स. 8116) सकाळी साडे आठ वाजता 4 ते 5 प्रवासी घेऊन जात होती. रिक्षा गारखेडा येथे आली असता गारखेडा येथील रहिवासी सुधाकर पंढरीनाथ मेतकर (मिस्तरी, 40) हे बांधकाम कारगीर भुसावळ येथे कामांवर जाण्यासाठी या रिक्षात बसले. रिक्षा गावाच्या थोडय़ाच अंतरावर गेली त्या वेळी रिक्षातील एका प्रवाशाला फिट आल्याने सोबत असलेल्या त्यांच्या प}ीने जोराने ओरडल्याने रिक्षाच्या चालकाचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा उलटली. त्यात सुधाकर मेतकर रिक्षाखाली दाबल्या गेल्याने जागेवरच ठार झाले. त्यांच्या जखमी दीपक शांताराम पाटील, व दयाराम परशुराम बारेला यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.दरम्यान दयाराम बारेला यांना जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले. सुदैवाने या रिक्षात प्रवास करीत असलेल्या जवळची 15 दिवसाची मुलगी बचावली. मृत सुधाकर मेतकर यांच्या मृत्यू मुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. रिक्षा चालक देवानंद गणेश गोराळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. जगदीश श्रीराम महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील कदम करीत आहे.