आरटीओचें आदेश धाब्यावर : बहुतांश रिक्षांमध्येही मीटरही नाही
जळगाव : गेल्या आठवड्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक ऑटोरिक्षा चालकांना मीटरप्रमाणे भाडे आकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ‘लोकमत’ प्रतिनिधीने बुधवारी या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत शहरातील विविध ठिकाणच्या रिक्षाथांब्यावर जाऊन व रस्त्यावरील रिक्षांना मीटरप्रमाणे भाडे आकारून इच्छित स्थळी सोडण्याबाबत विचारले असता, बहुतांश रिक्षाचालकांनी विरोध दर्शविला. तर प्रवाशांनीही मीटरने रिक्षा परवडणार नाही. १० ते १५ रुपये भाडे देऊन शेअर रिक्षाने शहरातील कुठल्याही भागात जाता येत असल्यामुळे, मीटरप्रमाणे प्रवास कशाला करायचा, हे थोडे मुंबई-पुणे शहर आहे. अशा प्रतिक्रिया देऊन मीटरला नापसंती दिली असल्याचे केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील रिक्षाचालकांकडून रेल्वे स्टेशनवरून बस स्टँड, टॉवर चौक, आकाशवाणी चौक व इतर ठिकाणी जाण्यासाठी १० रुपये प्रतिसीटप्रमाणे भाडे आकारतात. तर शहराबाहेरील लांबच्या भागात जायचे राहिल्यास १५ ते २० रुपये भाडे आकारतात. मात्र, आता डिझेलच्या दरवाढीमुळे काहीशी भाडेवाढ करण्यात आली असली तरी, कुणीही रिक्षाचालक मीटरप्रमाणे प्रवाशांची वाहतूक करत नाही. जर एखाद्या प्रवाशाने मागणी केल्यास त्यासाठी मीटर डाऊन करून मीटरप्रमाणे भाडे आकारले जाते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून डिझेल दरवाढीच्या नावाने रिक्षाचालकांकडून अवाजवी भाडे आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने लोही यांनी गेल्या महिन्यात शहरातील सर्व रिक्षा परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांनी मीटरप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारण्याचे आदेश काढले आहेत. मात्र, ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत या आदेशाची एकाही रिक्षाचालकडून अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे बहुतांश रिक्षांना मीटरही नसल्याचे दिसून आले. त्यामुळे लोही यांनी काढलेले आदेश हे कागदावरच असल्याचे दिसून आले.
इन्फो :
मीटरप्रमाणे भाडे आकारणीबाबत आलेला अनुभव असा..
१) ‘लोकमत’ प्रतिनिधीने रेल्वे स्टेशनवरून नवीन बसस्थानकावर जाण्यासाठी रिक्षाचालकाला मीटरप्रमाणे जाण्यासाठी विचारले असता, त्याने स्पष्ट नकार दिला. यावर लोकमत प्रतिनिधीने मीटरप्रमाणे न नेण्याबाबत विचारले असता, त्याने डिझेलचे दर १००च्या वर गेले आहेत, मीटरप्रमाणे गेल्यावर १६ रुपये होतात. जर मी तीन प्रवासी बसविले तर नवीन बसस्थानकाचे तीस रुपये मिळतील. त्यामुळे मीटरने मला परवडणार नसल्याचे उत्तर दिले. तर याच ठिकाणी काही रिक्षाचालकांनीही याप्रमाणे उत्तर देऊन मीटरप्रमाणे जायला नकार दिला.
२) यानंतर लोकमत प्रतिनिधीने नेहरू चौकात येऊन, येथील एका रिक्षाचालकाला मीटरप्रमाणे आकाशवाणी चौकात जाण्याबाबत विचारले असता, त्याने मीटरप्रमाणे कशाला जाता, पैसे जास्त होतील. त्यापेक्षा १५ रुपये द्या, असे सांगत मीटरने नेण्यास असहमती दर्शविली. तर दुसऱ्या रिक्षाचालकाने जळगावात मीटरप्रमाणे रिक्षा नाहीत. जर स्पेशल रिक्षा करायची असेल तर ४० रुपये लागणार असल्याचे सांगितले. मात्र, या रिक्षाचालकानेही मीटरप्रमाणे चालण्यास नकार दिला.
३) त्यानंतर जिल्हा रुग्णालयासमोरील एका रिक्षाचालकाला अजिंठा चौफुलीवर मीटरप्रमाणे जाण्याबाबत विचारले असता, त्यानेही २० रुपये द्या, असे सांगितले. मात्र, मीटरप्रमाणे का नाही, याबाबत विचारले असता, त्यांनी मीटर बंद असल्याचे सांगितले. यानंतर नवीन बसस्थानकासमोरील एका रिक्षाचालकाला पुन्हा मीटरप्रमाणे अजिंठा चौफुलीवर जाण्याबाबत विचारले असता, त्यांनी १८ रुपये किलोमीटरप्रमाणे मीटरचे पैसे लागतील असे सांगितले. त्यानंतर लोकमत प्रतिनिधीने नियमाप्रमाणे १६ रुपये भाडे असल्याचे सांगितले. यावर रिक्षाचालकाने जाण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर याच रिक्षाचालकाने जळगाव शहर लहान आहे. हे मुंबई-पुणे नाही. त्यामुळे जळगावात कुठल्याही रिक्षा मीटरप्रमाणे चालत नसल्याचे उत्तर दिले.
इन्फो :
जळगाव शहराचा विस्तार लहान असल्याने या ठिकाणी मीटरप्रमाणे रिक्षा चालविणे परवडणारे नाही. त्यामुळे प्रवाशांकडून प्रतिसीट १० रुपये आकारले जाते. तसेच प्रवाशांकडूनही कधी मीटरप्रमाणे भाडे आकारण्याबाबत सांगितले जात नाही, त्यांनी मागणी केली तर आम्ही ती सेवाही पुरवू.
- दिलीप पाटील, रिक्षाचालक
इन्फो :
जळगावात बहुतांश नागरिक प्रतिसीट १० रुपयेप्रमाणेच रिक्षाचालकांना पैसे देतात. आम्ही, मीटरप्रमाणे आकारणी केल्याचे ठरविल्यावर प्रवासी पैसे देणात नाहीत. त्यामुळे जळगावातील नागरिकांकडून मीटरप्रमाणे रिक्षाचे भाडे आकारण्याची अद्याप कुणाचीही मागणी नाही.
- जब्बार शेख, रिक्षाचालक
इन्फो :
जवळच्या अंतरासाठी काय मीटरप्रमाणे भाडे आकारायचे आणि जळगावात तसा प्रवास शक्यही नाही. मीटरने प्रवास म्हणजे जास्त पैसे लागतात. या ठिकाणी तसे आर्थिक परिस्थिती चांगली असलेले नागरिक नाहीत. त्यामुळे या ठिकाणी मीटरप्रमाणे रिक्षाचे भाडे आकारणे, हा प्रयोग शक्य नाही.
- विलास पाटील, प्रवासी
जळगावात शहरात मीटरप्रमाणे एकही रिक्षा सुरू असलेली दिसून आली नाही. सरासरी रिक्षावाले दहा रुपये सीट घेतात. ते प्रवासी म्हणून माझ्यासारख्या नागरिकाला परवडतेही. मात्र, मीटरप्रमाणे प्रवास करायचा म्हटल्यास ते परवडणार नाही.
- संजय देवरे, प्रवासी
इन्फो :
प्रवाशांनी मागणी केली तर संबंधित रिक्षाचालकाने मीटरप्रमाणे प्रवाशाला घेऊन जाणे बंधनकारक आहे. जर तसे रिक्षाचालक ऐकत नसतील तर, संबंधित नागरिकाने वाहतूक विभागाने तक्रार करावी, वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात येईल.
- श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी