जळगाव : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने रेल्वेने कर्नाटक राज्यात येणाऱ्या प्रवाशासांठी कोरोनाच्या आरटीपीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट व कोरोना लस घेतली असल्याचे प्रमाणपत्र आणणे बंधनकारक केले आहे. तरच या प्रवाशांना राज्यात प्रवेश देणार असल्याचे कर्नाटक सरकारने जाहीर केले असून, सध्या जळगावहून स्टेशनवरून कर्नाटकात जाणाऱ्या चार एक्स्प्रेस गाड्यांना १०० ते १२५ पर्यंत प्रवाशांचे कर्नाटकात जाण्याचे तिकीट बुकिंग करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेचे संकेत आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात येत असून, त्या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक राज्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. त्यानुसार कर्नाटक सरकारने आतापासूनच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ३० जूनपासून रेल्वेने कर्नाटक राज्यात येणाऱ्या प्रवाशासांठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत आणणे बंधनकारक केले आहे. इतकेच नव्हे, तर कोरोना लसीकरणाचा किमान एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्रही सोबत आणणे बंधनकारक केले आहे. याबाबत कर्नाटक सरकारने भुसावळ रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून, भुसावळ विभागातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना नियमांची अमंलबजावणी करण्याच्या सूचना पत्राद्वारे दिल्या आहेत. त्यानुसार भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे मंगळवारी दुपारी प्रसिद्धिपत्रक काढून, कर्नाटकातील कुठल्याही स्टेशनवर उतरण्यापूर्वी त्या ठिकाणी आरटीपीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट व लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत नेण्याचे आवाहन केले आहे.
इन्फो :
सध्या जळगाव मार्गे कर्नाटकात जातात एक्स्प्रेस
भुसावळ रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या जळगाव मार्गे कर्नाटकात जाण्यासाठी चार एक्स्प्रेस गाड्या सुरू आहेत. यामध्ये कर्नाटक एक्स्प्रेस, बंगलौर-अहमदाबाद एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस व हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. या चारही गाड्यांना दिवसभरात कर्नाटकातील विविध शहरांत जाण्यासाठी १०० ते १२५ प्रवाशांचे तिकीट बुकिंग होत असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
प्रवाशांनी धोका न पत्करण्याचे आवाहन
महाराष्ट्रातून रेल्वेने किंवा बसने कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना आरटीपीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट व लस घेण्याचे प्रमाणपत्र आणणे बंधनकारक केले आहे. यात रेल्वेने जाणाऱ्या ज्या प्रवाशांकडे आरटीपीआरच चाचणी रिपोर्ट नसेल, त्या प्रवाशांची तेथील स्टेशनवरच कोरोना चाचणी करण्यात येणार आहे आणि कोरोनाबाधित आढळल्यास तेथेच रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. तसेच ज्या प्रवाशांकडे आरटीपीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट असेल आणि त्या प्रवाशाने लस घेतली नसल्यास किंवा लस घेतली असतानाही लसीकरणाचे प्रमाणपत्र नसेल, अशा प्रवाशांवर कर्नाटक दंडात्मक कारवाई किंवा परत महाराष्ट्रात पाठविण्याची शक्यता असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.