जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसाच्या तुलनेत काहीसी वर्दळ वाढल्याचे शनिवारी दिसून आले. यात काही ठिकाणी पोलिसांनी दुचाकीस्वारांना दंडुक्याचा प्रसाद दिला तर रिक्षा चालकांनाही समज देऊन विनाकारण फिरल्यास वाहन जप्त करण्यात येईल, असा इशारा दिला.
जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी चांगला संयम दाखविलेला असताना दुसऱ्या दिवशी मात्र काही नागरिकांमुळे शहराच्या विविध रस्त्यांवर दुचाकी व इतर वाहने आल्याने तुरळक वर्दळ दिसून आली. यामुळे जनता कर्फ्यूच्या उद्देशाला खीळ तर बसणार नाही ना, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या दिवशी नागरिकांनी दूध, औषधी खरेदीचे कारण सांगत दुचाकीवर बाहेर पडल्याचे चित्र शहरात दिसून आले.
दुसऱ्या दिवशी बाजारपेठ बंद, रस्त्यावर मात्र वाहने
शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने १२ ते १४ मार्च दरम्यान शहरात जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या काळात दूध व औषधी व्यतिरिक्त इतर जीवनाश्यक वस्तूंचे व्यवहारही बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तीन दिवसांच्या या जनता कर्फ्यूमध्ये पहिल्या दिवशी बाजारपेठ कडकडीत बंद राहण्यासह रस्त्यांवरही केवळ बँक, शासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, दूध विक्री केंद्र चालक, औषधी दुकानधारक यांचीच वाहने येत-जात होती. मात्र, दुसऱ्या दिवशी नागरिक दुचाकीचा वापर करून बाहेर रस्त्यांवर फिरत असल्याचे चित्र होते. यामध्ये काही कर्मचारी असले तरी इतर काही जण दुचाकी घेऊन दूध केंद्र व औषधी दुकानांवर जात असल्याचे सांगत होते. अनेक जण तर रस्त्याच्या बाजूला दुचाकी लावून गप्पा मारत असल्याचेही चित्र होते.
पोलिसांकडून दंडुका
जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यावर वर्दळ वाढू लागल्याने टॉवर चौकात पोलिसांनी दुचाकीस्वार, रिक्षाचालक यांना थांबवून त्यांना विचारणा केली. यात अनेकांनी कुटुंबातील सदस्याचे, नातेवाइकांचे औषधे घ्यायला जात आहे, कोणी दूध घ्यायला आलो होतो, असे कारणे सांगत होते. मात्र, या दरम्यान अनेक जण विनाकारण फिरत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी दुचाकीस्वारांना दंडुक्याचे फटके देत घरी पाठविले. या सोबतच रिक्षा चालकांनाही समज देत विनाकारण फिरू नका, अन्यथा वाहने जप्त करू, असा इशारा दिला.
बाहेरच्या स्थितीविषयी उत्सुकता
जनता कर्फ्यूच्या दुसऱ्या दिवशीही दुकाने बंद होती, मात्र पहिल्या दिवसाच्या तुलनेत बाहेर फिरणारे वाढल्याचे चित्र शनिवारी सकाळपासून होते. या जनता कर्फ्यूमध्ये किराणा दुकान, भाजीपाला विक्रीला बंदी असल्याने मुख्य बाजारपेठेसह वेगवेगळ्या भागांमध्ये दुकाने बंद असल्याने वर्दळ कमी होती. मात्र बाहेर काय सुरू आहे, हे पाहण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र होते.