कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध हटवित काही बंधनांसह जिल्हा अनलॉक तर झाला, मात्र आता पहिल्या अनलॉकनंतर झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी सर्वांचा संयम आवश्यक राहणार असून यातूनच सर्वांचे आरोग्य उत्तम राहण्यासह रोजगार व अर्थचक्रही सुरळीत राहण्यास मदत होऊ शकणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर सर्व व्यवहार पूर्वपदावर येण्यासाठी तब्बल सहा महिने लागले. त्यानंतर मात्र फेब्रुवारी महिन्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा जिल्हावासीयांसह प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन यांची चिंता वाढली. या सोबतच पुन्हा निर्बंध लावावे लागले व अर्थचक्र पुन्हा एकदा थांबले. त्यानंतर प्रशासनाने निर्बंध अधिक कडक करण्यासह वेगवेगळ्या उपाययोजना करीत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणला. यात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहेच. यामुळेच अनलॉकच्या पाच टप्प्यात जळगाव जिल्हा पहिल्याच टप्प्यात राहू शकला. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर दोन टक्क्यांच्या खाली येण्यासह जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची उपलब्धताही निकषापेक्षा कितीतरी अधिक आहे. या सर्व कारणांमुळे जिल्हा अनलॉक झाला. यामुळे आता सर्व व्यवहार सुरळीत होण्यास मदत होणार असून रोजंदारीने काम करणाऱ्या व रोज व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्यांना मोठा आधार झाला आहे. इतकेच नव्हे करोडो रुपयांचा माल भरुन ठेवलेल्या व्यापारी बांधवांचाही व्यवसायाचा मार्ग खुला झाला आहे. हे सर्व दिलासादायक असले तरी आता पहिल्या लाटेनंतर झालेल्या चुका सर्वांनीच टाळणे महत्त्वाचे ठरणार आहे. पहिल्या अनलाॅकनंतर सणासुदीचा काळ सुरू झाला व त्या वेळी बाजारपेठेत कधी नव्हे एवढी गर्दी होऊ लागली. या सोबतच सामाजिक समारंभ, लग्न समारंभ, अंत्यविधी या साठी घालून दिलेल्या निर्बंधाकडे दुर्लक्ष करीत सर्वच ठिकाणी मोठी गर्दी होऊ लागली. यात राजकारणी मंडळीदेखील मागे राहिले नाही. राजकीय कार्यक्रम, बैठका, आंदोलन, दौरे करण्याचा धडाका सुरू झाला. यात भरात भर म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान व निकालावेळी झालेली गर्दी सर्वांचीच चिंता वाढविणारी होती. हे होत नाही की पुन्हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पुढारी मंडळींचे जिल्हा दौरे झाल्याने मोठा संसर्ग वाढीस वाव मिळाला. या सर्वांमध्ये बहुतांश जणांना तर मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर या त्रिसुत्रीचाही विसर पडत गेला व ज्याची भीती होती ती खरी ठरत कोरोनाची दुसरी लाट आली व अनेकांना आपल्या आप्तस्वकीयांना गमवावे लागले. आता ही वेळ पुन्हा येऊ द्यायची नसल्यास अनलॉक झाले असले तरी नियमांचे पालन करणे, गर्दी टाळणे गरजेचे राहणार आहे. अन्यथा तिसरी लाट दूर नाही हे सामान्य नागरिक, व्यावसायिक यांच्यासह राजकारण्यांनीही लक्षात ठेवले पाहिजे.
संयम आवश्यक, पहिल्या अनलॉकनंतरची पुनरावृत्ती नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:19 AM