लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सिंधी कॉलनीत असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये एक ५४ वर्षीय बाधित रुग्ण हे रात्री अडिच ते सकाळी साडे दहा पर्यंत बेशुद्धावस्थेत बेडखाली पडलेले होते, मात्र त्यांच्याकडे कोणीही बघितले नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आम्ही सकाळी गेल्यानंतर रुग्णाला बेडवर टाकून नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्याची महिती नातेवाईकांनी दिली. मात्र, रुग्णांची सगळी नोंद ठेवली जाते व रुग्णाला पक्षघाताचा झटका आला होता. नातेवाईकांनी रुग्णांची माहिती लपविल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. दरम्यान, सकाळी काही काळ या केंद्रावर गोंधळ झाला होता.
बेलव्हाय येथील एका ५४ वर्षीय प्रौढ व्यक्तीला मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांना जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी केल्यानंतर ते बाधित आढळून आले. त्यांना सिंधी कॉलनीतील महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये १४ रोजी दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्रीपासून त्यांचे नातेवाईक त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क करीत होते, मात्र, त्यांच्याशी संपर्क होत नव्हता, अखेर गुरूवारी सकाळी काही नातेवाईकांनी कोविड केअर सेंटर गाठले व संबधित रुग्ण हे सकाळी साडेदहा वाजेपर्यंत खालीच पडून होते. रात्रीपासून ते बेशुद्धावस्थेत पडून होते व आम्ही त्यांना अखेर बेडवर टाकले. सकाळी डॉक्टरांनी राऊंड घेतल्यानंतरही डॉक्टरांना ते दिसले नाही, अशी बेफिकीरी या ठिकाणी असल्याचे संबधित रुग्णाचे नातेवाईक सतीश नेमाडे यांनी सांगितले. यावेळी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी वैद्यकीय अधिाकारी डॉ. विजय घोलप उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर सूत्रे हलली
रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या स्वीय सहाय्यकांची भेट घेतली. त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांच्याकानावर ही बाब घातली. तातडीने सूत्र हलून अखेर संबधित रुग्णाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे नेमाडे यांनी सांगितले.
हिस्ट्री लपविली : डॉ. घोलप
संबधित रुग्णाची मधुमेहाची ट्रीटमेंट सुरू होती, ही महत्त्वाची माहिती नातेवाईकांनी लपविली. सीसीसीत केवळ सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना दाखल करण्यात येते. शिवाय रुग्णाच्या खोलीत अन्य रुग्ण होतेच. त्यांना पंख्याचा त्रास होत असल्याने ते खाली झोपले होते, अशी माहिती आहे. शिवाय सर्व रूग्णांची रात्री माहिती घेतली जाते. त्यांना पक्षघाचा झटका आला होता. तातडीने त्याना सिव्हीलला हलविल्याची माहिती, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांनी दिली.