जळगाव : गुरूवारी शहरातील एक रुग्ण एअर ॲम्ब्युलन्सने जळगावहून हैदराबादला रवाना झाला आहे. महाबळ परिसरात माहेर असलेल्या नयना विनोद पाटील (वय ३१) यांना न्युमोनिया झाला.त्यातच फुफ्फुसात संसर्ग वाढल्याने त्यांना इकमो थेरपी करून पुढील उपचारांसाठी हैदराबादच्या एका खासगी रुग्णालयात एअर ॲम्ब्युलन्सने नेण्यात आले. एअर ॲम्ब्युलन्सने नेलेला हा जळगाव शहरातील बहुधा पहिलाच रुग्ण आहे.
नयना विनोद पाटील या आपल्या कुटुंबासह भरुच, गुजरात येथे राहतात. त्यांचे पती विनोद पाटील हे एका खासगी कंपनीत व्यवस्थापक आहेत. त्यांना आधी कोरोनाची लागण झाली होती. संसर्ग वाढत असल्याने त्यांना २२ एप्रिल रोजी जळगावला हलवण्यात आले. एका खासगी दवाखान्यात दाखल केल्यावर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्याचसोबत फुफ्फुसात संसर्ग अधिकच वाढला. जळगावातील डॉक्टरांनी रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने दुसरीकडे हलवण्याचा सल्ला दिला. मात्र जळगावात त्यांच्यावर इकमो थेरपीने इलाज शक्य नव्हता. त्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथील रुग्णालयांमध्ये महिलेच्या नातेवाईकांनी चौकशी सुरू केली. मात्र त्यांना तेथून प्रतिसाद मिळाला नाही.
शस्त्रक्रियेद्वारे इकमो मशीन लावून नेले हैद्राबादला
अन्य रूग्णालयात शिफ्ट करण्यासाठीही नयना पाटील यांना इकमो मशीन लावावे लागणार होते. राज्यातील कोणत्याही रुग्णालयाने इकमो मशीन येथे पाठवण्यास तयारी दर्शवली नाही. अखेर हैदराबादच्या एका खासगी रुग्णालयाने एअर ॲम्ब्युलन्स द्वारे त्यांना इकमो मशीन पाठवण्याची तयारी दर्शवली. तसेच हे मशीन त्यांना लावण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. त्यासाठी चार डॉक्टर देखील या रुग्णालयानेच पाठवले. ही शस्त्रक्रिया गुरूवारी दुपारी करण्यात आली. त्यानंतर त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने जळगावहून हैदराबादला नेण्यात आले.
जळगाव शहरात एका खासगी रुग्णालयात या महिलेला दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना अन्य रुग्णालयात हलवण्याबाबत वारंवार सांगितले जात होते. मात्र दुसरीकडे कुठेही व्हेंटिलेटर बेड नसल्याने हलवले जाऊ शकत नव्हते, अशा परिस्थितीत रुग्णालयाकडून असहकार्य केले जात असल्याचा आरोप देखील नयना यांचे भाऊ सिद्धार्थ मनोहर पवार यांनी केला.
काय आहे इकमो
इकमो मशीन रुग्णाच्या फुफ्फुसाला मदत करण्यासाठी लावले जाते. त्यामुळे फुफ्फुसावरील ताण कमी होतो. आणि फुफ्फुसात साचलेला कफ काढण्यास वेळ मिळतो आणि मदतही होते. फुफ्फुसाच्या बाजूने लावलेल्या ट्युबमधुन रुग्णाला ऑक्सिजन दिला जातो.