लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पूर्ण कोविड करण्याचा निर्णय झाल्यानंतर आपत्कालीन विभाग हा नेत्र कक्षात हलविण्यात आला. सकाळी साडेअकराच्या सुमारास सर्व यंत्रणा या ठिकाणी आल्यानंतर सुरुवातीला पहिलाच रुग्ण हा विष प्राशन केलेला आला. गंभीर बाब म्हणजे ज्या रिक्षात रुग्णाला आणले जात होते ती अर्ध्यावरच बंद पडल्याने नातेवाइकांनी तिला धक्का देत रुग्णाला अखेर तशा परिस्थितीत आपत्कालीन विभागात दाखल केले.
आपत्कालीन विभागात डॉ.स्वप्नील कळस्कर व संबंधित परिचारिकांनी तातडीने रुग्णावर उपचार केला. कंडारी येथील बापू भीमराव सोनवणे यांनी विष प्राशन केले होते. त्यांना गंभीर अवस्थेत रिक्षात रुग्णालयात आणण्यात आले. रिक्षा डीन ऑफिसजवळ आल्यानंतर अचानक बंद पडली व सुरूच होत नव्हती, शिवाय रुग्णाला तातडीची वैद्यकीय सेवा हवी असल्याने अखेर नातेवाइकांनी रिक्षाला धक्का देत नेत्र कक्षापर्यंत आणले. या ठिकाणी रुग्णावर उपचार सुरू झाले.
कोविड तपासणीसाठी रुग्ण थेट कक्षात
आपत्कालीन विभाग नुकताच सुरू झाला असून बाहेर फलक नसल्याने रुग्णांचा गोंधळ उडत असून पहिल्याच दिवशी दोन रुग्ण या आपत्कालीन विभागात थेट कोविडच्या तपासणीसाठी आले होते. त्यांना डॉक्टरांनी सीटू कक्षात पाठविले.