लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात मंगळवारी ३४१ नवे बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, शहरातील खोटे नगर व पिंप्राळा अयोध्यानगर या भागात सातत्याने रुग्ण समोर येत असून, खोटेनगरात १२ तर पिंप्राळा येथे ११ नव्या रुग्णांची एकाच दिवसात नोंद झाली आहे. अयोध्यानगरातही सलग दुसऱ्या दिवशी पाचपेक्षा अधिक रुग्ण समोर आले आहेत.
शहरात गेल्या आठवडाभरापासून तीनशे किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहेत. सोमवारी तर आजपर्यंतची उच्चांकी नोंद शहरात करण्यात आली होती. मंगळवारी शहरात ३४१ बाधितांची नोंद झाली असून, ३३९ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सलग मृत्यू होत असल्याने, मंगळवारी मृत्यू नसल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सहा बाधितांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यात भुसावळ तालुक्यात २, यावल, धरणगाव, मुक्ताईनगर चोपडा या तालुक्यात प्रत्येकी १ बाधिताचा मृत्यू झाला आहे.
हे पाच हॉटस्पॉट
जळगाव शहर : ३४१
भुसावळ : ११७
चोपडा :१०६
जामनेर : ७२
धरगणाव : ५८
जळीत रुग्णांना बाहेर हलवा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जळीत रुग्णांना शाहू महाराज रुग्णालयात हलविण्याच्या तोंडी सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या होत्या. मात्र, याबाबत सूचना नेमक्या नसल्याने आरोग्य यंत्रणेची मात्र, यावरून तारांबळ उडाली होती.
तीन डॉक्टर बाधित
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुन्हा तीन डॉक्टर बाधित आढळून आले आहे. या ठिकाणी बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ही संख्या ५० पेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण वाढला आहे. दरम्यान, नियुक्त कर्मचारी पूर्ण रुजू न झाल्याने कोरोनाचे नवीन कक्ष मंगळवारीही सुरू होऊ शकलेले नव्हते.