लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : होम आयसोलेशनमधील रुग्णांवर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. या रुग्णांना केवळ दिवसातून काही फोन करून आता विचारणा करण्यात येत आहे. शिवाय प्रशासनाकडून पाहणी होत नसल्याने हे रुग्णही बिनधास्त असल्याचे गंभीर चित्र आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोविड केअर सेंटर पूर्ण उघडण्यात आले नव्हते. अशा स्थितीत कोरोना रुग्णांच्या लक्षणांवरून त्यांना थेट होम आयसोलेशनमध्येच ठेवण्याचे प्रमाण वाढले. ही संख्या ४ हजारांवर गेली आहे. उपचार सुरू असणाऱ्या एकूण रुग्णांपैकी तब्बल ८० टक्के रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. या रुग्णांकडून केवळ कागदोपत्री माहिती गोळा करून रुग्णांना परवानगी दिली जात आहे. गंभीर बाब म्हणजे रुग्ण बाधित आल्यानंतर त्यालाच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे.
असे आहेत निकष
होम आयसोलेशनसाठी सौम्य किंवा लक्षणे नसलेल्यांनाही परवानगी दिली जाते. यासाठी स्वतंत्र खोली, स्वतंत्र शौचालय, स्वच्छतागृह असावे, घरी काळजी घेणारी निगेटिव्ह व्यक्ती हवी, खासगी डॉक्टरांची, वैद्यकीय अधिकाऱ्यांची परवानगी हवी, प्रभाग अधिकाऱ्यांची अर्जावर स्वाक्षरी असावी, त्यांच्याकडून रुग्ण राहत असलेल्या ठिकाणाची शहानिशा केलेली असावी, रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे मॉनटरिंग करण्यासाठी एक आरोग्य कर्मचारी तपासणीसाठी यावा, असे काही नियम आहेत.
वास्तव : केवळ कागदोपत्री परवानगी दिली जात आहे. अनेक दिवस संपर्क नसतो, केवळ फोनवरून रुग्णांची विचारपूस केली जाते. रुग्ण बाहेर आहे की घरात हे बघितले जात नाही. रुग्णांचे मॉनटरिंग होत नाही.
उपचार सुरू असलेले रुग्ण : ६,२४८
होम आयसोलेशनमधील रुग्ण : ४,३०५