लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : फेब्रुवारी महिन्यापासून सातत्याने शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील अनेक रुग्णालये पुन्हा डेडिकेटेड
कोविड हॉस्पिटल्स झाली आहेत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना उपचार मिळत असले तरी काही ठिकाणी रुग्णांची फरपट होत असल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
फेब्रुवारी महिन्यापर्यंत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात होती. त्यामुळे कोविड हॉस्पिटल्सदेखील पुन्हा पूर्वीप्रमाणे काम करू लागली होती.
शासकीय महाविद्यालयात देखील पुन्हा नॉन कोविड रुग्णांना उपचार दिले जात होते. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू
लागली. सध्या दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा वेळी आरोग्य यंत्रणेतील बहुसंख्य भाग हा कोविडवरील उपचारांमध्ये अडकला आहे. त्यामुळे इतर आजारांच्या अनेक रुग्णांची फरपट होत आहे.
शासकीय रुग्णालये ३
कोविड शासकीय रुग्णालये ४
खासगी रुग्णालये ४५०
कोविड खासगी रुग्णालये १३०
बहुसंख्य डॉक्टर करताहेत कोविडवर उपचार
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बहुसंख्य डॉक्टर हे कोविडच्या रुग्णांवर उपचार करत अडकून पडले आहेत. त्यामुळे साहजिकच इतर आजारांच्या
रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. काही विशेष कोविड हॉस्पिटल्समध्ये इतर डॉक्टर रुग्णांना सेवा देण्यासाठी जात आहेत.
कोट - सध्या कोरोनामुळे सर्वच नियोजित शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. संसर्गाची शक्यता असल्याने ज्या शस्त्रक्रिया अत्यावश्यक नाहीत, त्या पुढे
ढकलण्यात आल्या आहेत. त्याव्यतिरिक्त इतर रुग्णांवर देखील उपचार सुरू आहेत. बहुतेक डॉक्टर हे कोविड आणि नॉनकोविड अशा दोन्ही रुग्णालयांमध्ये सेवा देत आहेत. - डॉ. राधेश्याम चौधरी, सचिव, आयएमए
जिल्हा रुग्णालयातून दररोज ५ ते ६ रुग्ण जाताहेत गेल्या दीड महिन्यापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय पुन्हा एकदा कोविडसाठी अधिग्रहित करण्यात आले. त्यामुळे येथील नॉनकोविड रुग्णालय डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलवण्यात येतात. तेथे कोविड आणि
नॉनकोविड अशी दोन्ही रुग्णालये आहेत. त्यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देखील काही तातडीचे उपचार होतात, आवश्यक असलेल्या रुग्णांना दाखल करून घेतले जाते. नंतर मात्र त्यांना डॉ. पाटील रुग्णालयात किंवा अन्यत्र पाठवले जाते.
खासगी १३० रुग्णालयांमध्ये कोविडचे उपचार
जळगाव जिल्ह्यात खासगी १३० रुग्णालयांमध्ये कोरोनाचे उपचार सुरू आहेत. याआधी ही सर्व रुग्णालये नॉनकोविड रुग्णांवर उपचार करत होते. आतादेखील काही रुग्णालयांमध्ये कोविड आणि नॉनकोविड अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांवर उपचार केले जातात.