पातोंडासह परिसरात अद्यापही एकही असा पेरणीजोगा पाऊसच झाला नाही. मध्यंतरी अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड व मूग तीळ पिकासह आदी पेरण्या घाईघाईने करून टाकल्या आहेत. काहींची लागवड होऊन पंधरा दिवस झाले आहेत. मृग नक्षत्र व संपूर्ण जून महिना गेला तरी पातोंड्यासह परिसरात पेरणीसाठी योग्य असा पाऊसच झाला नाही. खरीप हंगामातील पेरणीची वेळ निघून चालली. आता काय करावे, यापुढे पाऊस येऊनसुद्धा पेरणी केली तरी चाळीस ते पन्नास टक्के खरीप हंगामातील उत्पादन घटणारच, अशा निराशेच्या अवस्थेतील बळीराजा पुढे काहीच पर्याय उरला नाही.
बळीराजाने महागड्या कापसाच्या वाणांची लागवड करून टाकली; परंतु ज्यांनी अल्पशा पावसावर लागवड केली, त्यानंतर पाऊस पडला नाही. त्यामुळे कापसाने कुठे कोंब, कुठे काढले नाहीत. त्यामुळे पन्नास टक्के लागवड वाया जाऊन दुबार पेरणीची दाट शक्यता आहे. रोज सकाळ, संध्याकाळी ढगाळ वातावरणामुळे पाऊस येण्याची आशा असते. आता तर उन्हाळ्यासारखे ऊन पडत आहे, अशा परिस्थितीत काय करावे, हे बळीराजापुढे मोठे संकट आहे.