नशिराबाद : वीज वितरण कंपनीचे घरगुती ग्राहकांकडे सुमारे एक कोटी ६० लाख रुपयांची वीज बिले थकीत आहेत. ऊर्जा अभियानपर व अंतर्गत थकीत बिलांच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीच्या व नशिराबाद उपविभागातर्फे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावातून जनजागृती रॅलीकडून थकीत देयके भरण्याचे आवाहन केले.
कृषी धोरण २०२० योजनेबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. जनजागृती रॅलीचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता मेघशाम सावकारे, सहायक अभियंता पवन वाघुळदे, कनिष्ठ अभियंता अक्षय ढाकणे, माधुरी पाटील यांच्यासह वीज कंपनीचे कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते. ग्राहकांनी थकीत देयके लवकर भरून वीज कंपनीला सहकार्य करावे, कृषी संजीवनी योजना सुरू आहे त्यात शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीज वितरण कंपनीचे अधिकारी व जिप उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी केले. अधिकारी व कर्मचारी वर्गाने चौकाचौकात घोषणा देत वीज बिले भरा सहकार्य करा, असे आवाहन केले.
नशिराबाद उपविभागात ४ हजार ७९४ थकबाकीदार ग्राहक आहेत. त्यांच्याकडे सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी आहे, तर कृषी विभागाचे सुमारे एक हजार ४५२ ग्राहक थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे १० कोटी ५४ लाख रुपये थकीत आहे. कृषी संजीवनी योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीज वितरण कंपनीने केले आहे.