जळगाव : शाळांतील शिक्षकेत्तर पदे ठोक पद्धतीने भरण्याचा नवीन आकृतिबंध जाहीर करून अनुदानित शिक्षणच बंद करण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारने चालविला आहे. तरी हा निर्णय त्वरित मागे घ्यावा व वीस टक्के अनुदान शाळांना त्वरित अदा करण्यात यावे, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.मागील सरकारने शाळांच्या वीस टक्के वाढीव अनुदानाची तरतूद केलेली होती, तीच अनुदान देण्याची घोषणा या सरकारने शिक्षक आमदार निवडणुकीत केली व पुन्हा घूमजाव करून कर्मचारी विरोधी धोरण स्वीकारले आहे. पुनर्तपासणीचे फुटकळ कारण देऊन यावर्षाचे पुढच्या वर्षावर ढकलणे सुरू ठेवले आहे, असा आरोप जाधव यांनी निवेदनातून केला आहे.