जळगाव : कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गुरुवारी दंडात्मक कारवाईचे आदेश पारित केले आहेत. त्यासोबतच त्यावर कारवाई आणि समन्वयासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड आणि जमावबंदीचे उल्लंघन केल्यास प्रतिव्यक्ती दोनशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड, दुकाने, आस्थापना, विक्रेते यांनी विनामास्क दुकानात येणाऱ्या कोणत्याही ग्राहकाला वस्तू देऊ नये, दुकानदार आणि कर्मचाऱ्यांनी मास्क लावणे अनिवार्य आहे. या बाबींचे उल्लंघन केल्यास संबंधितांना ५०० रुपये दंड किंवा दुकान मालक सील करण्याची कार्यवाही करावी, एकाच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता अनावश्यकरित्या पाचपेक्षा गर्दी करून नागरिक जमा झाल्यास प्रति व्यक्ती २०० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना पाचशे रुपये दंडाची तरतूद आहे.
त्याच्या समन्वयासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यात ग्रामीण क्षेत्रासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य अधिकारी कमलाकर रणदिवे, महापालिका क्षेत्रासाठी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, नगर परिषद, नगरपालिका क्षेत्रासाठी जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश दिघे, पोलीस उपअधीक्षक डी.एम. पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील, मोटार वाहन निरीक्षक महेश देशमुख, अन्न आणि प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त योगेश बेंडकुळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.